उद्योग-पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सरकारचे सर्वतोपरी सहकार्य – आदित्य ठाकरे

627

जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धिंगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीत आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे उद्योजकांचे आवडते गुंतवणूक केंद्र आहे. जगभरातील विविध देशांनी पर्यटन, उद्योग यांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध देशांच्या महावाणिज्यदूतांना दिली.

हॉटेल ट्रायडंट येथे डिप्लोमॅटिक कम्युनिटी यांच्यामार्फत विविध देशांच्या महावाणिज्यदूतांची परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिनकेल्स्टाइन, न्यूझीलंडचे महावाणिज्यदूत राल्फ हेज, पीजीके ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन डॉ. गुल क्रीपलानी, राज्याच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध देशांचे महावाणिज्यदूत उपस्थित होते.

यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचेही भाषण झाले. मुंबईतील विविध देशांच्या महावाणिज्यदूत कार्यालयांसाठी सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी राजशिष्टाचार विभाग कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक

महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. राज्यात रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येत असून त्यासाठी उद्योगनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्यात येत आहे. राज्यात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत उद्योगसुलभ वातावरण आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य असून इथे इको टुरीजम, हेरिटेज टुरीजम, मेडिकल टुरीजम, वन्य जीव पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन अशा विविध पर्यटनसंधी उपलब्ध आहेत. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या देशातील पर्यटकांना महाराष्ट्रात निमंत्रित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात पर्यटन सुविधांच्या विकासासाठी व्यापक कार्य केले जात असून जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या