बाळाची पावलं घरात पडतात तेव्हा ते घर आणखी समृद्ध होत असतं. दिल्लीतील नरेला भागामध्ये नवजात बाळाचा जन्म होऊन 6 दिवस झाले होते. सहाव्या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घरात जोरदार तयार सुरू होती. पक्वान्नाचा बेत आखण्यात आला होता आणि पुऱ्या तळण्याचं काम सुरू होतं. ज्या बाळासाठी हे सगळं चालू होतं ते बाळ याच पुऱ्या तळण्याच्या कढईमध्ये पडलं. एका तरुणाचा हातात हे बाळ होतं आणि ते निसटून कढईत पडलं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. इवलंसं, नाजूक बाळ हे उकळत्या तेलात पडल्याने गंभीररित्या भाजलं आहे.
बाळ तेलात पडल्याचं ऐकल्यानंतर त्याची आई हे देखील हादरून गेली. तिला इतका धक्का बसला आहे की तिची अवस्था देखील चिंताजनक झाली आहे. यामुळे बाळासोबत तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुर्घटना होती का हे कृत्य मुद्दाम करण्यात आलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत. ज्या तरुणाच्या हातून बाळ पडलं तो तरुण कोण होता याचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी जी माहिती दिलीय त्यानुसार सेक्टर-5 मध्ये शंकर त्याची बायको आणि नवजात बालकासह राहात होता. सोमवारीच शंकरच्या मुलाचा जन्म झाला होता आणि हे त्याचं पहिलं अपत्य होतं. जन्मल्या नंतर सहा दिवस पूर्ण झालं की त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद साजरा करण्याची पद्धत आहे. या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी शंकरच्या शेजारी राहणारे काही तरुणही आले होते. या सगळ्यांना दारू ढोसली होती. यातल्या एका तरुणाने शंकरचा भाऊ मंटूच्या हातून बाळाला खेळवण्यासाठी घेतलं. त्याला केक भरवण्याचा हे तरुण प्रयत्न करत होते. या प्रयत्नात हे बाळ कढईतील उकळत्या तेलात पडले. बाळावर सध्या दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































