महागाईचे चटके! महागाई निर्देशांक 5.13 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई/नवी दिल्ली

पेट्रोल, डिझेलचे भडकलेले दर आणि काही खाद्यपदार्थांची झालेली भाववाढ यामुळे सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) 5.13 टक्क्यांवर गेला आहे. दोन महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. दरम्यान, इंधन दरवाढ आणि रुपयाची घसरण कायम असल्यामुळे ऑक्टोबरमध्येही महागाईचा दर वाढणार आहे. दिवाळीत महागाईचे चटके आणखी बसण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये घाऊक महागाई निर्देशांक 4.53 टक्के होता. त्यात वाढ होऊन 5.13 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर 2017ला हा दर 3.14 टक्के होता. मात्र, यावर्षी मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोलचे दर 17.20 टक्के, डिझेल 21.18 टक्के तर एलपीजी गॅस तब्बल 33.51 टक्क्यांनी महागला आहे. भाजी, फळे, चहा, मसाले यांचे दर सप्टेंबरमध्ये किंचित कमी झाले. मात्र, मका, गहू, मसूर, मूग, चिकन, मटणाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असल्यामुळे ऑक्टोबरमध्येही महागाई कायम राहील, अशी शक्यता आहे, असे रेटींग एजन्सी ‘आयसीआरए’च्या अर्थतज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवडय़ात किरकोळ महागाई निर्देशांक 3.69 टक्के असल्याचे जाहीर केले होते. ऑगस्टच्या तुलनेत केवळ 0.8 टक्के हा निर्देशांक कमी झाला आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये यातही वाढ होईल, असे नायर यांनी सांगितले.

summary- inflation rates are going higher