‘पिंजरा’ मत्स्यपालनाने दिला युवकांना रोजगार; धामणी धरणात मस्य आणि जलसंधारण विभागाचा अभिनव प्रयोग

सूर्या प्रकल्पातील धामणी धरणात ‘पिंजरा’ पद्धतीने मत्स्यपालन सुरू केल्यामुळे युवकांना मोठा रोजगार मिळाला आहे. मस्य आणि जलसंधारण विभागाने सुरू केलेला हा अभिनव प्रयोग यशस्वी होत आहे. धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच वीजनिर्मितीसाठी केला जात असतानाच आता मत्स्यपालनासाठीही त्याचा उपयोग होत आहे. धामणी व कवडास धरण मिळून सुमारे १६०० हेक्टर जलक्षेत्र आहे. या जलाशयात पाच वर्षांचा ठेका देऊन मत्स्यपालनाची परवानगी दिली आहे. शासनाच्या जाहिरात आयुक्त कार्यालयामार्फत मत्सव्यवसायासाठी दरवर्षी ठेके काढण्यात येणार आहेत. विविध सहकारी सोसायट्या तसेच खासगी व्यावसायिक अडीच ते अकरा लाख रुपयांची रक्कम भरून निविदा दाखल करतात. ठेक्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मत्स्यव्यवसाय विभाग आणि जलसंधारण विभाग यांना प्रत्येकी ५० टक्के महसूल मिळत आहे.

असे होते पालन

२०१६ पासून जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या योजना राबविण्यात येत असून धामणी धरण हा या योजनांचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे. पाईपचा मजबूत सांगाडा तयार करून त्याला प्लास्टिकचे ड्रम बांधले जातात. हे ड्रम संपूर्ण पिंजरा पाण्यावर तरंगत ठेवतात. पिंजऱ्यात योग्य आकाराचे जाळे बसवले जाते. निवडलेल्या मत्स्यबिजांचे संगोपन या पिंजऱ्यात केले जाते. धरणाचे नैसर्गिक पाणी, त्यातील पोषक तत्त्वे आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन माशांच्या योग्य प्रजातीची निवड केली जाते.

या प्रकल्पामुळे युवा मत्स्यपालक, स्थानिक श्रमिक, वाहतूकदार आणि पुरवठा साखळीतील अनेकांना रोजगार मिळत आहे. मत्स्यपालनासाठी आम्हाला कुशल लोक हवे आहेत. धामणी धरणातील सध्याचे पिंजरा पद्धतीचे मत्स्यपालन उपक्रम अंतिम टप्यात असून पुढील महिन्यात नवीन ठेका प्रक्रिया सुरू होणार आहे.
दिनेश पाटील, उपायुक्त, मत्स्यपालन विभाग