मधुमेह, कॅन्सर आणि दम्याची औषधे धोकादायक! सीडीएससीओच्या तपासणीत 205 औषधांचे नमुने फेल

देशातील रुग्ण ज्या आजारासाठी औषधे घेतात त्यातील 205 औषधांचे नमुने फेल झाले आहेत. या औषधांमध्ये कफ सिरप, ताप, मधुमेह, हृदयविकार, अपस्मार, संसर्ग, कॅन्सर, पोटासंबंधी आजार आणि दम्याच्या औषधांचाही समावेश आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) ने नोव्हेंबरमध्ये या औषधांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल 205 औषधांचे नमुने निकृष्ट आढळली आहेत. सीडीएससीओने जारी केलेल्या ड्रग अलर्टनुसार, हिमाचल 48, उत्तराखंड 39, गुजरात 27, मध्य प्रदेश 19, तामीळनाडू 12, हरयाणा 9, तेलंगणा आणि चेन्नईच्या प्रत्येकी 7, तर महाराष्ट्रातील 5 औषधे निकृष्ट आहेत.

कोणती औषधे निकृष्ट

निकृष्ट औषधांमध्ये पॅरासिटामॉल, मेटफॉर्मिन, क्लोपिडोग्रेल, ऑस्पिरिन, रॅमिप्रिल, सोडियम व्हॅल्प्रोएट, मेबेव्हेरिन हायड्रोक्लोराईड, टेलमिसार्टन, क्लेरिथ्रोमायसिन, सेफिसाइन आणि जेंटामायसिन इंजेक्शन यांसारख्या औषधांचा समावेश आहे. ही औषधे टायफॉइड, फुप्फुसे आणि मुत्रमार्गाचे संक्रमण, खोकला, दमा, अॅलर्जी आणि पचन संस्थेशी संबंधित आजारांवर देतात.