
गोरेगाव पूर्वेकडील आरे भास्कर गणपती विसर्जन स्थळावर भक्तीगीतांऐवजी भोजपुरी गाण्यांवर बिभत्स नाच करण्यात आला. पालिकेच्या नियंत्रण कक्षात भाजप कार्यकर्त्यांच्या मग्रुरीच्या जोरावर हा संतापजनक प्रकार केला गेला. यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. हिंदू संस्कृतीला गालबोट लावणाया या प्रकाराबाबत संबंधित ठेकेदार व इतरांची सखोल चौकशी व्हावी, तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार बाळा नर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
आमदार बाळा नर यांनी आरे भास्कर विसर्जन स्थळावरील असुविधांबाबत सहाय्यक आयुक्तांचे लक्ष वेधले होते. तसेच गणेशभक्तांची गैरसोय दूर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पालिकेने सुविधा उपलब्ध केल्या होत्या. मात्र त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी केला. त्यांनी कामाचा खोटा दिखावा करण्यासाठी आरे भास्कर गणपती विसर्जन स्थळावर अनधिकृतपणे अनेक बॅनर्स-पोस्टर्स लावले. तसेच विसर्जन स्थळावर पालिकेने उभारलेल्या नियंत्रण कक्षावर भाजप कार्यकर्त्यांनी ताबा घेतला आणि हैदोस घातला. त्या पेंद्रावर पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱयांनाही बसण्यास जागा ठेवली नाही. संपूर्ण नियंत्रण कक्ष भाजपचा असल्याचे वातावरण निर्माण केले. या हुकुमशाहीच्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तसेच ठेकेदारावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी आमदार बाळा नर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. आपण नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी भेट दिली, त्यावेळी ठेकेदाराने राजकीय दबावाखाली ध्वनीक्षेपकाची व्यवस्था बंद केली का, याचीही चौकशी करण्याची मागणी आमदार बाळा नर यांनी केली आहे.
विसर्जन स्थळातील मूर्तींची विटंबना
पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन केलेल्या मूर्ती रविवारी तेथील कमी पाण्यात उघडयावर पडून होत्या. पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी पोलखोल केली. न केलेल्या कामाचे श्रेय लाटणाऱया भाजपच्या प्रिती सातम यांनी मूर्तींची विटंबना करणाया अधिकाऱयांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी गाढवे यांनी केली आहे.
भाजपचे हेच संस्कार आहेत का? – बाळा नर
गणपती विसर्जन स्थळावरील नियंत्रण कक्षात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हैदोस घातला. या माध्यमातून महापालिकेच्या आयोजनावर कोणी वैयक्तिक श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार बाळा नर यांनी दिला. भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी केलेल्या बेताल विधानांचाही त्यांनी समाचार घेतला. सातम यांनी ज्याप्रकारे सोशल मिडियात विधाने केली आहेत, ती निंदनीय आहेत. भाजपने त्यांच्या कार्यकर्त्यांवर हेच संस्कार केले आहेत का, असा सवाल बाळा नर यांनी केला आहे.