देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 57 टक्क्यांनी घटली, कोरोनाच्या निर्बंधांचा ऑक्टोबरमध्येही फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीत पूर्णपणे कोलमडलेला देशांतर्गत विमान प्रवास अजूनही सावरलेला नाही. कोरोनाच्या निर्बंधांचा ऑक्टोबरमध्येही फटका बसला. या महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत 57.21 टक्क्यांची घट झाली.

महिनाभरात केवळ 52 लाख 71 हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 1 कोटी 23 लाख प्रवाशांची नोंद झाली होती.

नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्या कमी प्रवासी क्षमतेने सेवा देत आहेत. परिणामी, देशांतर्गत प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

तसेच पॅसेंजर लोड फॅक्टरवर (पीएलएफ) बुकाRगमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर मागणी वाढल्याने काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे पीएलएफचे चांगले चित्र दिसल्याचा डीजीसीएचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये नऊ स्थानिक विमान कंपन्यांचा पीएलएफ सरासरी 59.2 टक्के राहिला. यात स्टार एअरचा पीएलएफ सर्वाधिक 71.6 टक्के नोंद झाला आहे, तर पवनहंस या सरकारी हेलिकॉप्टर कंपनीचा पीएलएफ सर्वात कमी म्हणजेच 21.9 टक्के होता.

प्रमुख एअरलाईन्स व त्यांची प्रवासी संख्या

एअर इंडिया – 4.94 लाख
इंडिगो – 29.7 लाख
स्पाईस जेट – 7.04 लाख
गो एअर – 3.95 लाख
एअर एशिया – 3.74 लाख
विस्तारा – 3.39 लाख

विमानांचे वेळेवर उड्डाण करण्यात एअर एशियाने पहिला क्रमांक पटकावला. या एअरलाईन्सच्या तब्बल 98 टक्के उड्डाणांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या महानगरांमध्ये सेवा देताना वेळेचे काटेकोर पालन केले. मात्र याबाबतीत एअर इंडियाची सुमार कामगिरी दिसली. एअर इंडियाच्या फक्त 90.7 टक्के उड्डाणांनी वेळेवर सेवा दिली.c