अटकेदरम्यान ऑस्ट्रेलियन पोलिसांनी मारहाण केली, मानेवर गुडघा दाबला; हिंदुस्थानी वंशाचा व्यक्ती कोमात

अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची आठवण करून देणारी घटना ऑस्ट्रेलियात समोर आली आहे. अटकेच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी मानेवर गुडघा दाबल्याने 42 वर्षीय हिंदुस्थानी वर्षाच्या व्यक्ती कोमात गेल्याची घटना ऑस्ट्रेलियात घडली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत गौरव कुंडी नामक व्यक्तीला पोलीस बळजबरीने पकडून नेत असल्याचे दिसत आहेत. मात्र गौरव पोलिसांकडे मी काही चूक केली नाही, असे ओरडून सांगतोय. गौरवची पत्नी अमृतपाल कौरने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे.

पोलिसांनी गौरवला जमिनीवर ढकलत मारहाण केली. यानंतर गौरव बेशुद्ध पडला. त्याच्या पत्नीने आरोप केला आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघा दाबला, त्यानंतर पतीचे डोके पोलिसांच्या वाहनावर आदळले. गौरवची प्रकृती बिघडल्याने पत्नीने त्याला पोलीस स्टेशनमध्ये न नेता रुग्णालयात नेण्याची विनंती पोलिसांकडे केली. गौरवला रुग्णालयात नेण्यात आले. गौरवची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेली मारहाण आणि मानेवर गुडघा दाबल्याने गौरवच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दावा केला आहे की, गौरव आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी त्याने अटकेला हिंसकपणे विरोध केला. या घटनेची आयुक्त-स्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.