
एकीकडे युक्रेन चर्चेची तयारी दाखवत असताना व डोनाल्ड ट्रम्प तोडगा काढायला तयार असताना रशिया आणखी आक्रमक झाला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर 800 हून अधिक ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली आहेत. दोन्ही देशांत युद्ध सुरू झाल्यापासून मागच्या साडेतीन वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्यास दुजोरा दिला आहे. त्यानुसार रशियाने युक्रेनवर 805 ड्रोन डागले व विविध प्रकारची 13 क्षेपणास्त्रे डागली. त्यातील 747 ड्रोन आणि चार क्षेपणास्त्रे पाडल्याचा किंवा निक्रिय केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र 9 मिसाईल आणि 56 ड्रोन युक्रेनमध्ये 37 वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यात दोन जण ठार आणि 15 जखमी झाले.
युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शत्रूच्या हल्ल्यात पहिल्यांदाच सरकारी इमारतीचे नुकसान झाले आहे. आम्ही इमारती पुन्हा उभारू, परंतु गमावलेले जीव परत आणता येणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
युद्धनीतीत बदल
रशियाने आतापर्यंत सरकारी इमारतींना लक्ष्य करणे टाळले आहे. मात्र कालच्या हल्ल्यानंतर सरकारी इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. आपल्या अटींवर युद्धबंदी करण्यासाठी रशियाने रणनीतीत बदल केल्याचे बोलले जात आहे.