
सामना प्रतिनिधी, मुंबई
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने राज्यातल्या तेरा जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकसह ठाणे, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. भविष्यात राज्यातल्या 100 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळेल.
राज्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तेरा शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय शाळांच्या योजनेचे आज उद्घाटन झाले.
तेरा शाळांमध्ये योजना
ठाणे जिह्यातल्या खर्डी क्रमांक एक जिल्हा प्राथमिक शाळा, सिंधुदुर्ग जिह्यातल्या सावंतवाडी प्राथमिक शाळा चराठे नंबर एक, नाशिकच्या चांदवडमधील भोयोगाव जिल्हा प्राथमिक शाळा, कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर विद्यामंदिर, पुणे जिह्यातल्या शिरुरमधील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा, सातारा जिह्यातल्या वाईमधील बोपर्डी प्राथमिक केंद्रशाळेसह इतर सात शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाल्या आहेत.
वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा आयसीएसई, सीबीएसई, आयबी या मंडळाप्रमाणे नसून हा अभ्यासक्रम वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इतर बोर्डाकडे जाण्याऐवजी विविध शाळांची रांग या आंतरराष्ट्रीय मंडळाकडे लागेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





























































