
>>प्रसाद ताम्हनकर
इंटरनेटवर प्रसिद्ध होण्यासाठी सध्याच्या पिढीतील काही जण कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत आणि त्याचे उमटणारे प्रतिसाद हे चिंतेत जास्त भर घालणारे आहेत. हरयाणातील गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांकडून विवादास्पद व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याबद्दल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये असे व्हिडीओ टाकणारे तरुण आणि त्यांना मारहाण करणारे अशा सर्वांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
पहिली घटना ही हरयाणाच्या गुरुग्राममध्ये घडली. एका युवकाने 8 डिसेंबर रोजी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडीओमध्ये हा युवक गायीला खायला घालताना दिसता आहे.आपण गायीला चिकन मोमोज खायला घातल्याचा दावा या युवकाने व्हिडीओमध्ये केला होता. काही वेळातच हा वादग्रस्त व्हिडीओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला. या युवकाची ओळख पटवून काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्याच्या घरापाशी गोळा झाले. या युवकाच्या घराला घेराव घालून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या वतीने हात जोडून माफी मागत असल्याचा व्हिडीओ बनवून तोदेखील समाज माध्यमावर टाकण्यात आला. या मारहाण प्रकरणात अटक झालेल्या तरुणांनी आपल्या सोबत स्थानिक लोकांनीदेखील या युवकाला मारहाण केल्याचा दावा केला. मात्र गुन्हा फक्त आपल्यावर दाखल झाल्याचेदेखील बोलून दाखवले.
चिकन मोमोज खाणाऱ्या तरुणाच्या माफीचा व्हिडीओदेखील मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला. काही लोकांनी त्या तरुणाचा वादग्रस्त व्हिडीओ आणि नंतर माफी मागतानाचा व्हिडीओ एकत्र करून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. हे प्रकरण थंड होत नाही तोच या माफीनाम्याच्या व्हिडीओवर दिल्लीच्या एका तरुणाने गोरक्षकांसाठी अपमानास्पद भाषा वापरलेला आणि त्यांना आव्हान देणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यामुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आणि हिंदुत्ववादी संघटना त्याच्या घरी धडकल्या. त्यालादेखील मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. या युवकाचादेखील हात जोडून माफी मागत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्रसिद्धीच्या हव्यासासाठी असे भावना दुखावणारे विवादास्पद व्हिडीओ बनवणे हे अयोग्यच आहे. मात्र अशा प्रकरणात लोकांनी कायदा हातात घ्यावा का? हा प्रश्न पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोमाने चर्चेत आला आहे. दोन्ही प्रकरणांनंतर सोशल मीडिया सरळ सरळ दोन गटांत विभागला गेल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला देशात कायद्याचे राज्य आहे आणि अशा प्रकरणांमध्येदेखील कायद्याने हस्तक्षेप होण्याची गरज असल्याचे एका गटाचे म्हणणे आहे, तर अशा प्रकरणात कोणताही ठोस कायदा नसल्याने अनेक लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि खास करून हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. अशा लोकांना कायद्याची भाषा कळत नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे असा दुसऱ्या गटाचा दावा आहे.
दोन्ही बाजू योग्य, अयोग्य काय ते ठरवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे मांडत असताना खोटय़ा प्रसिद्धीच्या नादापायी तरुणाई किती अविचारी वागू लागली आहे यावर सायबर क्षेत्रातील तज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. प्रत्येकाच्या हातात आलेला मोबाईल, सहजपणे उपलब्ध होत असलेला भरभक्कम डाटा आणि हजारो लाईक्स आणि प्रतिसादाची नशा तरुण पिढीला विनाशाकडे नेत असल्याची खंत ते व्यक्त करतात. इंटरनेटवर प्रसारित होणारे साहित्य, त्याची जबाबदारी आणि अशा साहित्यावर गरजेचे असलेले नियंत्रण हे सर्व किती महत्त्वाचे आहे हे या घटनांनी पुन्हा समोर आले आहे.
अशा प्रकारचे साहित्य बनवणाऱ्या आणि प्रसारित करणार्यांवर कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्य म्हणजे अशा साहित्याला प्रोत्साहन देणाऱ्या, दाद देणाऱ्या आणि ते जास्त प्रसिद्ध करणाऱ्यांवरदेखील लगाम लावणे आवश्यक आहे. समाजातील विचारवंतांनी एकत्र येत आता सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे असे मत अनेक लोक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अशी प्रकरणे पुनः पुन्हा घडत आहेत आणि त्यावर कोणताही ठोस उपाय मात्र योजला जात नसल्याची खंत सर्वच स्तरांतून व्यक्त होताना दिसत आहे.



























































