
जगभरातील अनेक देशांत मंगळवारी इंटरनेट ठप्प झाल्याने एकच खळबळ उडाली. अनेक मोठमोठय़ा वेबसाईट ओपन झाल्या नाहीत. त्यावर ‘एरर-503 सर्व्हीस अनअव्हेलेबल’ असा संदेश दिसत होता. यात सोशल मीडिया, सरकारी आणि न्यूज वेबसाईट्सचा समावेश होता. युरोप-अमेरिकेतील वेब सेवांना याचा सर्वात मोठा फटका बसला.
प्राथमिक अहवालानुसार एका सीडीएन ( पंटेंट डिलिव्हरी नेटवर्क) कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंटरनेट सेवा ठप्प झाली. असं मानलं जातंय की, अमेरिकेची क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणारी कंपनी ‘फास्टली’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यासंदर्भात अधिक तपशील मिळवण्याचे काम सुरू आहे.
कोणत्या साईटस्वर परिणाम
- न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यांच्यासह मोठय़ा आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट आणि पोर्टल डाऊन झाले. गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि फायनान्शिअल टाइम्स यासारख्या साईट्स यांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
- लोकप्रिय शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉन तसेच रेडीट, स्पॉटिफाय, पेपल, शॉपिफाय आदी साईट्स ठप्प झाल्या.
- ब्रिटिश सरकारची वेबसाईट gov.uk काम करत नव्हती.
‘फास्टली’चे म्हणणे काय…
सीडीएन म्हणजेच कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स हा इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरचा महत्त्वाचा भाग मानला जातो. ‘फास्टली’सारख्या कंपन्या ही सर्व्हीस पुरवतात. त्या आपल्या ग्लोबल नेटवर्कच्या माध्यमातून वेब सेवांना उत्तम बनवतात. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, असे अमेरिकेच्या फास्टली कंपनीने सांगितले. काही वेबसाईट हळूहळू सुरू होत असल्याचेही म्हटले आहे. ही समस्या का निर्माण झाली, याबाबत आता काही सांगणे कठीण आहे. कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला किंवा अन्य बाह्य हस्तक्षेप याबद्दल कंपनीने काहीच सांगितलेले नाही.
- काही मोजक्या कंपन्यांच्या हाती इंटरनेटचे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यामुळे तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळेच एक छोटी समस्या मोठय़ा त्रासाचे कारण बनल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.




























































