
देशभरातील मोठय़ा आणि गर्दीच्या कार्यक्रमांना लक्ष्य करून मोबाईल चोरी करणाऱया आंतरराज्य टोळीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल 2025मध्ये या टोळीने हात साफ केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेक्षकांप्रमाणे वेशभूषा करून आणि भाडय़ाच्या गाडय़ा वापरून ही टोळी गर्दीत मोबाईल चोरण्याचे काम करत होती.
शिवडी पोलिसांनी सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल 2025मध्ये चोऱया करणाऱया या टोळीतील पाच जणांना अटक केली. आरोपी दिल्ली आणि कर्नाटक येथील रहिवाशी असून ते कोणाला संशय येणार नाही असे हटके कपडे परिधान करून गर्दीत सहज मिसळले होते. 19 ते 21 डिसेंबर दरम्यान शिवडी येथील टिंबर पाँड प्लॉट, अटल सेतूजवळ सनबर्नचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गर्दीमुळे चोरीच्या घटना घडू शकतात, याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. 20 डिसेंबर रोजी शिवडी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन विशेष तपास पथके तयार केली.
कारमध्ये मोबाईलही सापडले
कारची तपासणी केली असता 15 चोरीचे मोबाईल पह्न आणि गुह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. आरोपींची नावे शहबाज भोले खान ऊर्फ शोएब (28), मोहितकुमार रामकुमार पटेल (25), निखिल एकनाथ यादव (19) आणि महेशकुमार सुनेहरीलाल पुंभार (20) अशी असून ते सर्व दिल्लीचे रहिवाशी आहेत. अटक आरोपींकडून 19 मोबाईल पह्न आणि सुमारे 19 लाख 14 हजार रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे.


























































