पुण्यातील आंतरराज्यीय टोळीचा तपास एनआयएकडे द्या! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

अंबर नावाच्या एका हवाला ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. तो, त्याची मैत्रिण असे मिळून 300 जणांची एक प्रोफेशनल टोळीच आहे. या टोळीच्या आंतरराज्यीय कारवाया असून नार्कोटिक्स पासून हवालापर्यंत सर्व बेकायदेशीर कामे ही टोळी करते. त्यांचे आंतरराष्ट्रीय लागेबांधेही आहेत, पुण्यातील या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ही मागणी केली. पुण्यात तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच फोन नंबरचे फार्ंजग करून खंडणी वसुली करण्यात आली आहे. पुण्यात मोठय़ा प्रमाणात फेक माथाडी आहेत. उद्योजकांकडून त्यांच्या नावावर मोठया प्रमाणात वसुली सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे हवालाची बेकायदेशीर कामे करणाऱया टोळीचा पुणे पोलीस योग्यरीतीने तपास करून छडा लावत होते, मात्र अचानक कोणाचा तरी दबाव आला आणि हा तपास थांबला. आता पोलीस त्याचा क्लोजर रिपोर्ट तयार करत आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयए किंवा सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

इसाक बागवान प्रकरणात मुंबईचा तो बडा नेता कोण

मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांची बारामती येथे मोठय़ा प्रमाणात प्रॉपर्टी आहे. 42 एकर एनए जमिन आहे. इसाक बागवान कार्यरत असताना त्यांनी या प्रॉपर्टी आपल्या वडील तसेच बंधूंच्या नावावर खरेदी केल्या. नंतर केवळ साध्या अर्जाच्या आधारावर त्या परत आपल्या नावावर त्यांनी करून घेतल्या. फरीद मोहम्मद अली बिल्डर नामक व्यक्तीने 41 लाख रूपयांना बागवान यांची प्रॉपर्टी विकत घेतली. या व्यक्तीचे नंतर निधन झाले. पण या प्रकरणात मुंबईतील एका नेत्याने हस्तक्षेप केला, तो नेता कोण आहे, असा सवाल करताना या प्रकरणाचा पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे, तो आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देणार आहोत, असे ते म्हणाले.