Missed you आई !!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अरुण नलावडे,  ज्येष्ठ अभिनेते  

आईच्या हातचा आवडता पदार्थ कोणता ? 
– मासे आणि काळ्या वटाण्याची उसळ

का आवडतं?
– माझ्या लहानपणापासूनची या पदार्थांची असलेली जुनी चव माहित आहे, पण आता सध्या ती या पदार्थांना कधीच येत नाही. आईच्या हाताला ती चव होती. मला स्वत:लाही स्वयंपाक करता येतो. इतरांकडेही खाल्लं आहे त्यांनीही छान बनवलंय, पण तिच्यासारखी चव येतचं नाही, असं मला वाटतं.

सगळ्यात जास्त काय miss करता ?
– आईच्या हातचं लाल भोपळ्याचं थालीपिठ मी खूपच मिस करतो. ते हल्ली कोणीच बनवत नाही. घरीही ते बनवायला सांगितलं होतं, पण आईने केल्याप्रमाणे लाल भोपळ्याचं थालीपिठ होतच नाही. शाळेत जायचो तेव्हा आठवड्यातून तीन वेळा तरी ते माझ्या डब्यात असायचं. आई सांगायची की, लाल भोपळा फारच पौष्टिक असतो. त्यामध्ये ताकद आहे. त्यामुळे माझी आई माझ्यासाठी भोपळ्याचं थालीपिठ बऱ्याचदा बनवायची.

 स्वयंपाकात, घरकामात अजून आईला मदत करता का ?
– आता आमची आई नाही, पण स्वयंपाकात मदत करायला पत्नीने शिकवलंय. तरीही माझा मूळ शिकवण या कामाची आईनेच दिली आहे. मला आता उत्कृष्ट जेवण करता येतं. आईनंतर मला पत्नीनेही स्वयंपाकघरातील काही कामे शिकवली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मी स्वतंत्रपणे स्वयंपाक करू शकतो.

आई म्हटल्यावर किंवा समोर आल्यावर मनात सर्वप्रथम काय विचार येतो ?
– आमचे लहानपणी केलेले लाडच जास्त आठवतात. कधी कधी आपल्यासाठी वडिलांकडे खोटं बोलणं, माझी बाजूने उभं राहणं या गोष्टी मला प्रामुख्याने आठवतात.

आईला काय आवडतं ?
– तिला सिनेमा बघायला खूप आवडायचं. तिचा हा गुण माझ्यात उतरला आहे. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची आवड होती याशिवाय अभंग म्हणायची आवड होती. तिचा आवाजही बरा होता.

तिच्या आवडीचा पदार्थ तुम्ही कधी केलाय का ?
– तिला माझ्यासारखे मासे आवडतात. तळलेले बोंबिल मी बनवले होते. तिने ते आवडीने खाल्ले होते.

आईशी गप्पा कोणत्या विषयावर मारता ?
– माझ्या व्यवसायामुळे दुर्दैवाने मला आईशी फार बोलायला कधीच वेळ मिळाला नाही. माझं तिच्याशी बोलणं कमी असलं तरीही तिच्या तब्येतीविषयीची चौकशी कायम करायचो. शेवटचे काही वर्ष माझ्यासोबत ती राहिली होती.

आवडत्या पदार्थाची पाककृती ?


–  लाल भोपळा स्वच्छ धुवून साल काढून किसून  घ्यायचा. त्यानंतर भोपळा उकडून घ्यायचा. नंतर त्यामध्ये गूळ किसून घालायचा. आवडीनुसार सुकामेवा म्हणजे, बदामाचे काप, चारोळी, बेदाणे घालू शकता. वेलची सुगंधासाठी घालायची. यामध्ये रवाही घालायचा. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हे मिश्रण एका पसरट ताटात काढून थालीपिठ तयार करायचं. दीड दोन इंचाचा थर लावायचा. शक्यतो हे थालीपिठ वाफेवरच करायचं. भाजणार असाल तर खालचा भाग खरपूस होईल, असे पाहावे. चविष्ट आणि पौष्टिक असे हे थालीपिठ आहे.