व्यवसायात सकारात्मकता आवश्यक

>> शुभांगी बागडे

कोरोना विषाणूचा हा काळ सर्वांची परीक्षा घेणारा ठरला. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर आपण सावरत आहोतच. मात्र उद्योग-व्यवसायावर याचा परिणाम नेमका कसा झाला आणि आता यानंतरच्या काळात या क्षेत्राला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याची माहिती देणारी ही मुलाखत.

कोविड-19 चा व्यवसाय क्षेत्रावर नेमका कसा परिणाम दिसून येतोय?

– कोरोनाचा परिणाम झाला आहेच. हिंदुस्थानातील व्यवसाय असा कधीच थांबला नव्हता. त्यामुळे हा जो वेळ मिळाला आहे तो नवीन योजनांसाठी, ब्लू प्रिंटसाठी नक्कीच वापरता येईल. मात्र हा परिणाम पुढे फार तर सात-आठ महिने राहील. काही बाबतीत आपण पूर्वपदावर येतोय असंही म्हणायला हरकत नाही. यादरम्यानच्या काळात सगळंच काही निराशा आणणारे नाही. चीनला आतापर्यंत उत्पादन क्षेत्रातील हब म्हटलं जात होतं, पण आता जगाचं लक्ष हिंदुस्थानकडे वळत आहे ही सकारात्मक गोष्ट घडत आहे. त्यामुळेच आपल्याला आता वाटतंय की सगळं थांबलं आहे, पण पुढच्या काळात अनेक नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा सर्वच क्षेत्रांत होणार आहे. कोरोनानंतर हिंदुस्थानचे अर्थकारण चांगल्या अर्थाने नक्कीच बदललेले असेल.

उत्पादन क्षेत्रात नक्की कोणते बदल अपेक्षित आहेत?

– कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांत बदल घडणार आहे. उत्पादन क्षेत्रात व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील बदल हिंदुस्थानला प्रगतीकडे नेणाराच असेल, कारण आता राष्टी^य आणि राज्य पातळीवरच यासाठी आग्रह धरला जाणार आहे. उद्योग-व्यवसायासाठी शासन अनेक नवनवीन योजना आणण्याच्या विचाराधीन आहे. नवीन उद्योगांसाठी कर सवलती, कर योजना, बँकिंग क्षेत्राचा थेट अंतर्भाव, उद्योग प्राधिकरणान्तर्गत वेगवेगळ्या संधी अशा अनेक गोष्टी याअंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यातही ग्रामीण हिंदुस्थानचा विकास याला अग्राम असल्याने सर्वच क्षेत्रांत याच लाभ घेता येणार आहे.

नवीन व्यवसाय धोरणांतर्गत आपण आवश्यक आणि अनावश्यक व्यवसायांबाबत नेमका कोणता बदल दिसू शकतो?

– आजच्या काळातील व्यवसायाच्या धोरणाबद्दल बोलताना फरक तर जाणवतोच. आवश्यक व्यवसायांचे स्वरूप बदलू शकते. मात्र त्यांचं महत्त्व कायम राहीलच. उदाहरणार्थ आरोग्य सेवेशी संलग्न असलेले उद्योग. आता अनावश्यक व्यवसाय ही आपली दुय्यम गरज असते. पण ती गरज असते. त्यामुळे पर्यटन असो व मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय, त्यांनाही फार काळ थांबून चालता येणार नाही. मात्र यातही तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच आता प्रत्येक व्यवसायात लोक या तयारीनेच उतरतील.

कोविड-19 नंतर व्यवसाय व इतर क्षेत्रांतील एचआरची भूमिका कशी असू शकते? यापुढे कोणत्या कामाच्या पद्धतींना प्राधान्य दिले जाऊ शकते?

– कोणत्याही क्षेत्रात एचआरची भूमिका ही त्या व्यवसायासाठी संतुलित अशी असते. यात गुंतवणुकीबरोबरच परस्पर संवादालाही महत्त्व असते. जर आपण आमच्यासारख्या कंपनीबद्दल बोलत असू तर आमचा व्यवसाय हिंदुस्थानभर विस्तारला आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला भविष्यासाठी तयार असलेले कर्मचारी द्यायचे आहेत. म्हणजे कंपन्यांच्या रोजगाराचे प्रमाण बदलेल. देशातील कंत्राटी रोजगार वाढतील. लोकांना एकाच वेळी बऱयाच गोष्टी करण्याची सुविधा यामुळे मिळणार आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही आता सामान्य बाब असणार आहे. हा बदल अगदी अचूकपणे स्वीकारला गेला असला तरी तो कायमस्वरूपी राहण्याची शक्यता तशी कमी आहे. मात्र कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य ठरणार आहे.

कोविड-19 च्या काळात आपल्या कंपनीने कोणती मोहीम सुरू केली आहे?

– कोरोनाचा काळ हा खऱया अर्थाने माणुसकीचं दर्शन देणारा ठरला. हा एक प्रकारचा दानयज्ञच होता आणि पुढच्या काळातही तो अविरत सुरूच राहील. यार एस्सारनेही गरजूंना मदतीचा हात पुढे केला. हे मदतकार्य व्यापक पातळीवर सुरू राहिलं आणि आताही सुरूच आहे. महाराष्ट्रात आम्ही सुमारे 2 दशलक्ष लोकांना अन्न पोहोचवण्याचे काम केले आहे. याशिवाय गुजरातसह देशभरातील लोकांना खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत. आम्ही पीपीई किट्स, मुखवटे अशी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. व्हेंटिलेटरची गरज मुख्य गरज होती. कस्तुरबा, नायर अशा हॉस्पिटलसोबत आम्ही काम केलं. या संकटकाळात स्थलांतरित, मजूर, ट्रान्स जेंडर्स या वर्गाला खूप सोसावं लागलं. त्यांना मदत पुरवण्यात आम्ही आग्रही राहिलो. आरोग्य सेवा, मास्क, सॅनिटायझर, जेवण, कपडे हे तर त्यांना पुरवलेच, परंतु आम्ही आवश्यक तेथे सॅनिटरी पॅडही पुरवले. कारण हा स्वच्छताविषयक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही महाराष्ट्रात 8 लाख सॅनिटरी पॅड पुरवले आहेत. यासह आम्ही झारखंड आणि कश्मीरमध्ये सॅनिटरी पॅड पुरवले आहेत.

तुमच्या आगामी पुस्तकाविषयी काय सांगाल?

– माझं ‘फेच युअर ओन कॉफी’ हे पुस्तक 60 वैविध्यपूर्ण कथाच आहेत असं मी म्हणेन. आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. अनेक भूमिका आपण पार पाडतो. यादरम्यान प्रत्येक टप्प्यावर आपण शिकतच असतो. ही शिकवण कायम आपल्याला लक्षात राहते. आपल्या आयुष्याला उभारी देते. माझ्या घडलेल्या अशाच सकारात्मक आनंद देणाऱया घटना कथारूपात मी मांडल्या आहेत. रोजच्या आयुष्यात घडणाऱया कथांपैकी काही क्रिकेट, बॉलीवूड या विश्वाशी निगडीतही आहेत. हे लिखाण आधी मी ब्लॉग स्वरूपातच लिहिले आणि आता ते पुस्तकरूपात येत आहे. हलक्याफुलक्या वळणातील साध्यासोप्या भाषेतील हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल.

आपली प्रतिक्रिया द्या