खारीचा वाटा- हक्काचे सोबती गवसले

>> आरती तळवलकर-मोये (संकलक)

लॉकडाऊनमुळे मला माझ्या इमारतीतच तीन हक्काचे मित्र मिळाले. त्यांना मी केलेल्या छोटय़ाशा मदतीच्या बदल्यात मला त्यांची कायमची सोबत मिळाली.

लॉकडाऊनमध्ये सगळीकडेच रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळे सामान्य माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांचेही हाल झाले. त्यात माझ्या सोसायटीच्या खाली दोन कुत्रे होते. मी जेव्हा माझ्या कुत्र्याला खाली फिरायला घेऊन जायचे तेव्हा हे दोन कुत्रे असायचे. खरं तर भटक्या कुत्र्यांच्या कोणी फारसे जवळ जात नाही. कारण त्यांचा काही नेम नसतो, पण त्यांच्याकडे बघून जाणवले की, ते भुकेने त्रासले आहेत. मग मी एक दिवस त्यांच्यासाठी फक्त भात घेऊन गेले. या कुत्र्यांना नेमकं काय देतात हे मला माहीत नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना काय चालतं हे कळत नव्हतं. मग मी जे घरात असायचं…डाळभात, दहीभात, दूधभात ते त्यांना घेऊन जायचे. मग आठवडाभराने मला जाणवलं की, हे कुत्रे माझी वाट बघत असतात. साडेआठ वाजले की, आतुरतेने वाट पाहतात. त्यांना माहीत असतं…मी खाली या वेळेत येणार आहे. मग माझ्या लक्षात आलं की, हे किती दिवस असं बंद असणार देव जाणे. रोज त्यांच्यासाठी काय बनवायचं असा विचार पडायचा. त्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी डॉग फूड आणूया. त्यांच्यासाठी पंधरा किलो डॉग फूड मी मागवले. ते त्यांना द्यायला सुरुवात केली. मुळात कुत्रा हा प्राणी फार आवडत असल्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं मला सोपं झालं. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, तिथे एक मांजर येऊन त्यांचं जेवण खायची. त्यांचं खाणं झालं की, ती येऊन संपवून टाकायची. मग तिच्यासाठीही मी जास्त जेवण घेऊन जायचे. ती फार क्यूट आहे. माझ्याकडे जर्मन शेफर्ड आहे. त्याला मी खाली घेऊन जायचे तेव्हा ती माझ्या मागे मागे फिरत असते. माझा कुत्रा तिच्यावर अटॅक करेल, काय करेल याचा काही फरक तिला पडत नाही. ती माझ्या मागे मागे फिरत असते. जणू काही तिच्या त्या वागण्यातून माझे आभार मानत असते. दुसरी गोष्ट म्हणजे मी प्राण्यांची संवाद साधते. त्यांच्याशी बोलते ते माझे प्रोफेशन आहे. त्यामुळे काही दिवसांनी ती मांजर माझ्याशी बोलायला लागली की, मला आता तू वेगळं आणून देत जा. ती लोक मला खाऊ देत नाही. मग मी तिच्यासाठी वेगळं आणायला लागले. तिला एकीकडे जेवण द्यायचे आणि दुसरीकडे त्या दोन कुत्र्यांना जेवण द्यायचे. मग ती मला सांगायला लागली की, आज मला हे नको, दुसरं काहीतरी दे. सुदैवाने ते सगळं मला लॉकडाऊनमध्ये शक्य झालं.

मुके प्राणी फार इमानदार असतात. त्यांच्याबद्दल काही गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण त्यांना जेवण दिलं, विसरून जातो, पण ते आपल्याला चांगलंच लक्षात ठेवतात. जेव्हा मी माझ्या लेनमध्ये एकटी चालत असेन, अंधार असेल तर हे दोघं माझ्या सोबत असतात. म्हणजे त्यांना त्यातून सांगायचं असतं की, तू घाबरू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत किंवा जेव्हा मी खाली कोणत्या कामासाठी जाते, तेव्हा ती मांजर जिथे असेल तिथून माझ्या जवळ येते. मागेपुढे घुटमळते. चिकटून उभी राहणार. ते जसे आहेत तसेच असतात. माणसांप्रमाणे त्याने मदत केली त्याची परतफेड करूया अशी भावना त्यांच्यामध्ये नसते. ते तसे नसतात. ते त्यांना आपली व्यक्ती समजतात, मैत्रीण समजतात. खाली गेल्यावर कोणीतरी आपलं माणूस आलंय ही भावना त्यांच्या वागण्यात असते. जेव्हा मी खाली जाते तेव्हा माझं आपोआप सोशल डिस्टन्सिंग होतं. तीन कुत्रे माझ्या सोबत चालत असतात. त्यामुळे माझ्या आसपास कोणी येत नाही. त्यांच्या वागण्यातून आपण त्यांचे कोणीतरी आहोत ही भावना दिसते आणि तेच समाधान देऊन जाते.

आपली प्रतिक्रिया द्या