
गरजेच्या प्रसंगी पाठीशी उभ्या राहिलेल्या कलाकारांविषयी सांगत आहे अभिनेता सचिन देशपांडे.
मी मूळचा नागपूरचा. जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा माझा स्ट्रगल पिरिअड सुरू झाला. माझी नाटय़क्षेत्रात काही ओळखीची मंडळी होती. म्हणजे डॉ. विलास उजवणे म्हणा किंवा डॉ. गिरीश ओक म्हणा. मी त्यांना, काम मिळवण्यासाठी फोन करायचो. ही मंडळी मग ओळख करून द्यायला मला सेटवर बोलवायचे. पण इतकी गोड होती ही माणसे की ते म्हणायचे, ‘तू दुपारी एक ते सवाच्या दरम्यान ये. यावेळी लंचब्रेक होतो. सगळे रिकामे असतात. तुझी ओळख करून देऊ’. तिथे गेल्यावर ही मंडळी जेवणाचा आग्रह करायचे. आम्ही तीन-चार मुले एकत्र मिळून जायचो. ओळखी सोबतच आम्हाला पोटभर जेवणही मिळायचे. मी या दोघांचा ऋणी आहे. कारण त्या दिवसांमध्ये त्यांना अचूक जाणीव होती की या मुलांना कामाची तर गरज आहेच; पण मुख्यत्त्वे पोट भरण्याचीही गरज आहे. त्यामुळे हे सर्व माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहे.
एक प्रसंग आहे तो, ‘खरं सांगायचं तर’ या नाटकाच्या निमित्ताने घडलेला! या नाटकात मी एक छोटीशी रिप्लेसमेंट केली. तो कोर्ट रूमचा प्रसंग होता आणि त्यात मला दोन साक्षी द्यायच्या होत्या. विक्रम गोखले, सुप्रिया पिळगावकर अशी मंडळी त्या नाटकात होते. त्यांच्यासमोर अचानक रिप्लेसमेंट म्हणून उभे राहणे मला कठीण जात होते; पण तेव्हा विक्रमकाकांनी आणि सुप्रियाताईंनी खूपच आधार दिला.
या नाटकात विवेक लागू सरकारी वकिलांची भूमिका करायचे. एकदा त्यांच्या कुठल्यातरी कामामुळे त्यांनी मला, नाटकात त्यांची भूमिका करायला सांगितली. माझे धाबेच दणाणले. संपूर्ण नाटकभर प्रश्न विचारणे, असा तो रोल आणि समोर साक्षात विक्रम गोखले वगैरे. त्यांच्यासमोर ही भूमिका मला करायची होती. मला सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, ‘या भूमिकेत खूप प्रश्नोत्तरे आहेत. आपण तालीम करू या’. आम्ही पाच तास सलग तालीम केली. वास्तविक, त्या इतक्या मोठय़ा स्टार होत्या आणि असे असताना त्यांनी मला बोलावून माझी वेगळी तालीम घेणे वगैरे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यांनी मला त्या भूमिकेतले खाचखळगे समजावून सांगितले.
प्रयोगाचा दिवस उजाडला. मी मात्र घामाघूम झालो होतो. नाटक पाठ होते वगैरे ठीक आहे; पण आत्मविश्वास नव्हता. तेव्हा विक्रम गोखले मला म्हणाले, ‘चिरंजीव, घाबरलात का?’ मी म्हटले ‘हो, खूप टेन्शन आले आहे’. त्यावर ते म्हणाले, ‘अरे घाबरायचे काय? हातात स्क्रिप्ट ठेव आणि प्रश्न विचार. कारण तू वकील आहेस आणि तुझ्या हातात पेपर असायला काहीच हरकत नाही’. हे ऐकून मला हुरूप आला. प्रसंग सुरू झाला. माझ्या हातात स्क्रिप्ट होती. मी पहिला प्रश्न विचारला आणि माझ्या लक्षात आले की मला काम नीट जमतेय. मग मी पूर्ण साक्ष घेतली आणि माझ्या जागेवर येऊन बसलो.
माझ्यासमोरच विक्रम गोखले बसायचे. त्यांनी टेबलावर टकटक केले आणि एक पेपर माझ्यासमोर केला. त्यावर लिहिले होते ‘व्हेरी वेल डन, कीप इट अप.’ एवढय़ा अनुभवी कलाकाराने ऑन स्टेज प्रयोग चालू असताना मला माझ्या कामाची पावती लिहून दिली. मला त्याने प्रचंड हुरूप मिळाला. मला आतापर्यंत कुठले अवॉर्ड मिळाले नाही; पण मला त्याची खंत नाही. विक्रमकाकांची ती पावती म्हणजे मला मिळालेले मोठे अवॉर्ड होते. त्यानंतर स्क्रिप्ट हातात न घेता मी व्यवस्थित प्रयोग केला. हा प्रसंग असा आहे की जो कायम माझ्या मनात राहणार आहे. त्यांनी मला त्यांचा कधी शिष्य केले की नाही, मला माहीत नाही. पण माझ्यासाठी ते गुरू होते. त्या क्षणाला मी त्यांचे पाय धरले आणि त्यांना माझ्या आयुष्यातले गुरुपद दिले.
शब्दांकन – राज चिंचणकर


























































