दर्जेदार भूमिका असेल तरच सिनेमा स्वीकारतो- शिवाजी साटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे छोट्या पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत आबालवृद्धांना मोहिनी घालणारे अभिनेते म्हणजे शिवाजी साटम. महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमात ते पारशी बाबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत…  

‘मी शिवाजी पार्क’ सिनेमाविषयी काय सांगाल?

– महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात पाच वयोवृद्ध मित्रांची गोष्ट आहे. माझ्यासह अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, विक्रम गोखले हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सर्वसामान्य माणसाचा उद्वेग या सिनेमातून मांडण्यात आला आहे. ‘न्यायदेवता आंधळी असते आम्ही डोळस होतो’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. वृद्ध व्यक्ती एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना दिसणार आहेत. गौरी पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती दिलीप यादव व सिद्धार्थ जैन करीत असून मंगेश जगताप, शंकर मिटकरी सहनिर्माते आहेत.  

सिनेमातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?

– यात मी पारशी बाबाची भूमिका साकारतोय. ते सेवानिवृत्त डॉक्टर आहेत. पाच सेवानिवृत्त झालेले मित्र रोज शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर वॉकच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात. एकमेकांची मजामस्ती करणे, सोबत गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजीचा आस्वाद घेणे असा त्यांचा दिनक्रम. सगळं काही सुरळीत सुरू असताना पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडते  हे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल.  

दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

– खूप मजेशीर. सेटवर आम्ही एकमेकांची खूप मजामस्करी करायचो. त्यामुळे वेळ कसा निघून जायचा हे कळायचेच नाही. सिनेमात आम्ही सर्वांनी एक रॅप साँगदेखील गायले आहे. महेशसोबत काम करायला मला नेहमी आवडते. महेशसोबत काम करायचं म्हणजे मुळातच तुम्ही खवय्ये असले पाहिजे. इतरांना खाऊ घालायला त्याला खूप आवडते. मुंबईत जेव्हा शूटिंग होते तेव्हा आमचे दुपारचे जेवण महेशच्याच घरी असायचे.

 

तुम्ही निवडक सिनेमांमध्येच झळकता यामागचे कारण ?

– दर्जेदार भूमिका असेल तरच मी सिनेमा स्वीकारतो. उगाच सिनेमांचे आकडे वाढवण्यात मला रस नाही. ‘सीआयडी’ मालिकेमुळे माझे शेड्यूल खूप बिझी असतं, पण चांगला सिनेमा असेल तर मी त्यासाठी नक्कीच वेळ काढतो. महेशचे सिनेमे मी आवर्जून स्वीकारतो याचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी त्याने मला वेगवेगळी पात्रं रंगवायला दिली आहेत.

‘सीआयडी’ची 21 वर्षे!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’ जानेवारीमध्ये 21 वर्षे पूर्ण करणार आहे. मालिका सुरू झाली तेव्हा आम्ही इतका लांबवरचा पल्ला गाठू याचा साधा विचारही केला नव्हता. संपूर्ण युनिटची मेहनत आणि प्रेक्षकांचे प्रेम हेच या मालिकेच्या यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. अनेक लहान मुले मला छान छान पत्रं पाठवतात. ‘‘मलाही तुमच्यासारखंच सीआयडी व्हायचे आहे’’ अशी इच्छा व्यक्त करतात तेव्हा खूप छान वाटतं. काही वेळा मोठी माणसेदेखील मला पत्र पाठवून आपले दुःख व्यक्त करतात. असे अनेक बरे–वाईट अनुभव आजही येत असल्याचे साटम यांनी सांगितले.