बी पॉझिटिव्ह : शब्दांच्या पलीकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगळ्या व्यक्तींकडे, घटनांकडे जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मी स्वतःला नशीबवान समजतो. प्रेम, आपुलकी, माया, काळजी, जिव्हाळा माझ्या ओंजळीत इतका मला मिळाला की, माझी ओंजळसुद्धा अपुरी पडावी.

पुण्यात आसक्त कला मंचद्वारे आम्ही एकांकिका करत होतो. त्याच्या तालमी पाहायला सारंग साठे आला होता. फार तन्मयतेने तो तालमी पाहत असे आणि नंतर तो प्रयोगालासुद्धा आला. प्रयोग संपल्यावर मला आवर्जून भेटला, म्हणाला, ‘‘सुयश, फारच सुंदर काम केलेस, प्रचंड मेहनत केली आहेस ते प्रकर्षानं दिसतंच. मी अधिक काय बोलू? प्रेक्षकांची पावती पुरेशी बोलकी आहे.’’

एकाच क्षेत्रातल्या एका कलाकाराने दुसऱया कलाकाराला कशी दिलखुलास आणि मनमुराद दाद द्यावी याचं हे बोलकं उदाहरण.

आसक्तच्या आशीष मेहता यांच्याकडून थिएटरच्या संबंधित जे जे पडेल ते ते काम करायला हवं हे माझ्या मनावर बिंबवलं गेलं. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, सर्वस्व विसरून रंगमंचाशी कसं एकरूप व्हावं हे मला शिकवलं.

मोहित टाकळकर ‘चार कोटी विसरभोळे’ नावाचं नाटक बसवत होता तेव्हा सारंग मला त्याच्याकडे घेऊन गेला आणि मला एक मेंटोर मिळाला मोहितदादाच्या रूपाने. त्याने मला थिएटरचे विविध पैलू दाखवले. केवळ अभिनय पुरेसा आहे असं नाही. बॅकस्टेज, लाईट असे अनेक पैलू शिकून घेणे अत्यंत गरजेचे आहे हे माझ्या मनावर बिंबवलं. एक ना अनेक गोष्टी, ज्या नाटकाशी संबंधित आहेत त्या शिकवल्या. आज सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, कित्येक नाटकांचे लाइटिंग मी केलंय,

बॅकस्टेजसुद्धा सांभाळलं आहे. मी टेलिव्हिजनवर काम करायला हवं हा ट्रिगर मोहित टाकळकरने मला दिला आणि माझ्यासाठी एक नवं अवकाश खुलं झालं…टीव्हीचं!

तो दिवस मला आजही आठवतो. पृथ्वी थिएटरमध्ये पंडित दुबेजींना समर्पित असा एक छोटा प्रयोग इरावती कर्णिकने बसवला होता. बाहेर पाहिलं तर काय? रत्ना पाठकजी, के. के. मेनन, नसिरुद्दीनजी असे एकापेक्षा एक दिग्गज प्रयोगाला आले होते. मला क्षणभर काय करावे ते सुचेना. प्रयोग अपेक्षेपेक्षा जास्तच छान रंगला होता. मी जितेंद्र जोशीला म्हणजेच जित्याला फोन केला. म्हटलं, ‘‘अरे, असं असं झालंय. प्रयोग एक नंबर झालाय. मी खूप आनंदी आहे. काय करावं तेच सुचत नाही रे जित्या.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘थांब, मी तिथे येतो’’ आणि त्या रात्री जित्या माझ्यासाठी रिक्षा करून पृथ्वीला आला. त्यानंतर तो मला म्हणाला की, आज तुझा हा आनंद आहे ना, तो आनंद मला आणखी मोठा करायचा आहे. आज माझ्याकडून पार्टी. खिशात जेवढे पैसे आहेत ना, तेवढे सगळे छान खर्च करू या.’’ असं म्हणत त्यानं मला मुंबईत फिरवलं. त्या रात्री वेगवेगळं खायला घातलं. हे त्याचं रूप मला बरंच काही शिकवून गेलं. दुसऱयांच्या आनंदामध्ये आपण आनंद कसा मानावा हे मी जित्याकडून शिकलो. ‘चार कोटी विसरभोळे’च्या निमित्ताने जितेंद्र जोशीसोबत झालेली ओळख मैत्रीत परिवर्तित झाली. एक नवा ‘माणूस’ नावाचा मित्र मला जितूच्या रूपात मिळाला.

त्यानंतर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत मृणाल देशपांडे आणि हर्षदा खानविलकर यांच्या सोबत मी काम करत होतो. आमचे एक छान घरगुती कौटुंबिक नातं जुळलं होतं त्या शूटिंगदरम्यान. त्याचदरम्यान माझा एक मोठा ऑक्सिडेंट पुणे-मुंबई महामार्गावर झाला. ते कळताक्षणी दोघींनी मला जीवापाड मदत केली. हर्षदाताईंनी तर संजय जाधव सरांना घटनास्थळी पाठवून सर्वतोपरी मदत करायला सांगितलं. प्रसंगी दुसऱयाच्या मदतीला आपण धावून जायला हवं ही शिकवण फार मोलाची आहे. रक्ताची, नात्याची नसलेली अशी माणसं आपल्यासाठी इतकं काही करू शकतात, त्यांचे आभार मानणे औपचारिक वाटेल, पण आज या लेखाच्या निमित्ताने मला आभार मानावेसे वाटतात. हर्षदाताईंना तर मी माझी दत्तक आईच म्हणतो.

वैभव चिंचळकरला विसरून कसं चालेल? ‘बंध रेशमाचे’च्या वेळेस मी नवखा होतो. मुंबईत नातेवाईकांकडे राहायला मी जराही कम्फर्टेबल नव्हतो. ‘‘सुयोग, तू काळजी करू नकोस. तू माझ्या घरी रहा. मी तुझी काळजी घेईन. तुला कॉल टाइमची पण आठवण करून देईन’’ आणि तो जसा बोलला तसा वागला. घराची नव्हे, तर मनाचीसुद्धा दारं उघडली त्याने. त्याच्या आईने जितकी काळजी त्याची घेतली, तितकीच माझी पण घेतली. आमच्या खाण्यापिण्याच्या वेळा केवळ सांभाळल्या नाहीत, तर जपल्या. इतक्या निःस्वार्थीपणे परक्या मुलासाठी कोण करतं? शब्दांच्या पलीकडल्या भावना आहेत माझ्या मनात.
– शब्दांकन ः निनाद पाटील