
>> शेफ विष्णू मनोहर
धनश्री दळवी. नृत्यांगना… अभिनेत्री… निर्माती… नेतृत्वगुणांमुळे इतरांकडून काम करवून घ्यायला आवडते.
प्रारंभी नृत्यशास्त्रात प्राविण्य मिळावल्यावर धनश्रीने याच कलेत करियर करायचे ठरवले. त्यानंतर वेगवेगळे स्टेज शो करता-करता नाटकातही तिला काम मिळू लागले. लहानपणापासूनच वेगळे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे चार वर्षांपूर्वी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात जावं असं मनात आलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. असे म्हणतात की, तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल आणि ती पूर्ण करण्याचा तुमचा ठाम निश्चय असेल तर आयुष्यात ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते. अशातच तिची भेट झाली नरेश व श्वेता बिडकर या दाम्पत्याशी. श्वेताकडील स्टोरी ऐकल्यावर तिने त्यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचंच फलित म्हणजे मागच्या आठवडय़ात रुजू झालेला ‘वन्स मोअर’ हा चित्रपट.
‘वन्स मोअर’ या चित्रपटात तिने निर्मात्याच्या भूमिकेबरोबरच दोन वेगळय़ा भूमिका प्रत्यक्ष वठवल्या आहेत. एक आहे आत्मिका आणि दुसरी अंजली. या चित्रपटदरम्यान तिची माझी भेट झाल्यावर आम्ही शूटिंग असताना बरेच वेळा एकत्र ब्रेकफास्ट व लंच घेत असू. तेव्हा लक्षात आलं की, तिला खायला आवडतं; पण बनवण्यात तितका रस नाही. मग तिच्याशी गप्पा मारता-मारता बऱयाच गोष्टी पुढय़ात आल्या. चित्रपटात तिची एक जी भूमिका आहे ती घरगुती स्त्रीची आहे. दुसरी लढाऊ वृत्तीची राजकन्या. तिला जेव्हा म्हटलं यापैकी कुठली भूमिका करायला आवडली तर ती म्हणाली, आधी मी पनीर सँडविचेस मागवलं आहे ते खाते आणि नंतर यावर बोलते. त्यानंतर ती म्हणाली, मला गृहिणीची भूमिका थोडी कठीण पडली कारण मला स्वयंपाक करायला आवडत नाही. मी मुळातच लिडर आहे. त्यामुळे मला आत्मिकाची भूमिका जास्त आवडली. कारण त्यामध्ये ती वॉरियर म्हणूनच वावरली आहे.
जेवणात कमी जास्त काय हे शोधायला धनश्रीला खूप आवडते, पण स्वतःवर बनविण्याची वेळ आली की, आईकडे किंवा सासूबाईंकडे स्वयंपाकाचा ताबा देऊन मोकळी होते. नाश्त्यात काय आवडतं हा प्रश्न केल्यावर तिच उत्तर होतं इडली, सांबार, पोहे, कोथिंबीर वडी, यापैकी पोहे हा असा प्रकार आहे की मी कुठल्याही फॉर्ममध्ये दिवसभर खाऊ शकते. याशिवाय जेवणात चिकनचे वेगवेगळे प्रकार खूप आवडतात. एकदा ब्राझिलला गेलो असताना तिथलं जेवण काही आवडलं नाही मग तिथलं कापलेलं सलाड घेऊन त्यावर वेगवेगळे ड्रेसिंग, येथून नेलेल्या चटण्या व काही ड्रायफ्रुटस् वापरून मी माझी-माझीच भाजी तयार केली आणि ती मी भाताबरोबर खायचे. तिथेच मी एक सूपचा प्रकार तयार केला आणि तो तिथल्या रेस्टॉरंटवाल्यालासुद्धा आवडला. त्याचे नामकरण इथे हिंदुस्थानात आल्यावर केले. त्याचं नाव आहे रमथमाठ, आता रमथमाठ हे नाव त्यावेळी मला लागलेल्या प्रचंड भूकेमुळे जो काही माझा रमथमाठ झाला त्यावरून दिले आहे. मी तशी नेहमी माझ्या कामात असते त्यामुळे कुठे जास्त जात नाही, पण कोणाला माझ्याकडून काही काम काढून घ्यायचं असेल तर ते मला पोहे खायला बोलावतात. त्यांना नक्की माहीत असतं की पोह्यांच्या नावाने मी त्यांच्याकडे जाईनच.
यापुढेसुद्धा चित्रपटनिर्मिती करशील का? असं विचारल्यावर ती म्हणाली की, आमच्या दुसऱया चित्रपटाचं कामसुद्धा सुरू झालं आहे. भविष्यात पाण्यावर तरंगणारं आणि सिनेमाचं थीम असलेलं एखादं रेस्टॉरेंट उघडण्याची इच्छा आहे. तेवढय़ात आम्ही ऑर्डर केलेलं व्हेजिटेबल फॉन्सु व चॉकलेट पिझ्झा पुढय़ात आला. ते इतकं टेम्पटिंग होतं की आम्ही आमचं बोलणं आवरतं घेतलं.
शेव भाजी
साहित्य – 1 वाटी तुरकाटी शेव, (ही शेव बाजारात मिळते), 4 चमचे आलं-लसूण पेस्ट, अर्धी वाटी भाजलेल्या कांद्याची पेस्ट, हळद, तिखट चवीनुसार, 1-1 चमचा धणे-जिरे पावडर, 4-5 तमालपत्र, पाव वाटी भाजून वाटलेले सुकं खोबरं, पाव वाटी भिजवलेली खसखस, 1 चमचा काळा मसाला.
कृती – खसखस, खोबरं, कांदयाची पेस्ट व आलं-लसूण पेस्ट एकत्र वाटून घ्या. पॅनमधे तेल घेवून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. तेल सुटल्यावर हळद, तिखट, धणे-जीरे पावडर टाकून चांगले परता. थोडे पाणी घाला. चांगले तेल सुटल्यावर त्यात गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून पुन्हा गरम पाणी घालून उकळा रस्सा थोडा पातळसर ठेवा. भाजी वाढताना त्यामधे वेळेवर शेव घालून वाढा.
इडली-सांबार
साहित्य – 1 वाटी उडदाची डाळ, दीड वाटय़ा तांदूळ, अर्धा चमचा मेथी दाणे.
कृती – उडदाची डाळ, तांदूळ व मेथी 2 तास भिजवून वाटून घेणे. त्यानंतर त्यात थोडे चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून फेटून ठेवावे. 7-8 तास आंबवल्यानंतर त्याच्या इडल्या बनवाव्यात.
सांबार – 4 वाटय़ा पाणी उकळत ठेवून त्यामध्ये लाल भोपळा, दुधी, गाजर, शेवग्याच्या शेंगा, फ्लॉवर, छोटे कांदे या सर्व भाज्या साधारण 2 वाटय़ा चिरून शिजवून घ्या. शिजताना यात चिंचेचा कोळ, हिंग, तिखट घाला. भाज्या शिजल्यावर 1 वाटी शिजलेली तुरीची डाळ घालून उकळी येऊ द्या. नंतर यात अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा सांबार मसाला घाला.
चिकन लॉलीपॉप
साहित्यः 8 चिकन ड्रमस्टिक , 3 चमचे सोया सॉस, 4 चमचे वाटलेले लसूण, 1 कांदा, अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा मीठ, 1 चमचा कस्टरशायर सॉस, 2 वाटलेल्या लाल मिरच्या, 1 कप ताज्या ब्रेडचा चुरा, पाव वाटी अक्रोडचा चुरा, अर्धा कप पांढरे तीळ, 1 कप मैदा किंवा कॉर्नफ्लोअर, 2 अंडयाचा आतील पांढराभाग, 2 चमचे लोणी.
कृती – सोया सॉस, मीठ, मिरची, लसूण-कांदा, कस्टरशायर सॉस हे सर्व एकत्र कालवून त्यात लेग पिसेस सात-आठ तास बुडवून ठेवावेत. (लेग पिसेसला सुरीने चिरा द्याव्यात) आयत्या वेळेला एक-एक पीस उचलून मैद्यात घोळवावा व मग तसाच अंडयाच्या पांढऱया भागात बुडवावा. ब्रेडचा चुरा आणि तिळात घोळवावा व बेकिंग ट्रेमध्ये ठेवावा. नंतर त्यावर लोणी टाकून चार-पाच मिनिटं किंवा वरून सोनेरी, चॉकलेटी रंग येईपर्यंत हे पीस ओव्हनमध्ये भाजावेत.



























































