नव्या वाटेवरची बुजुर्ग पावले- चं. प्र. देशपांडे

232

>> मुलाखत- नमिता वारणकर

ज्येष्ठ नाटककार, लेखक चं. प्र. देशपांडे. यांनी आपले सर्व साहित्य संकेतस्थळावरून वाचकांसाठी खुले केले आहे. अगदी येणारे नवे पुस्तकही वाचकांना येथे उपलब्ध होईल.

वाचकांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून आपले लेखन विनामूल्य उपलब्ध करून देण्यामागे काय विचार आहे?
– संकेतस्थळ तयार करण्यामागे खास विचारपूर्वक, योजनापूर्वक असं काही तयार केलं नाही. सुरुवातीला माझी काही पुस्तकं निघाली. नंतर मी नोकरीच्या निमित्ताने निरनिराळ्या गावी फिरत होतो. त्यामुळे फारसा संपर्क कुणाशी राहिला नाही आणि पुस्तक प्रकाशित करून देण्याबाबतीतले प्रयत्न त्या काळात झाले नाहीत. त्यानंतर 1996 साली म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा आपल्या लेखनासाठी प्रकाशक मिळवण्यापेक्षा त्याचं संगणकीकरण करू आणि त्याची सीडी तयार करू, असा विचार करून 2003 साली सीडी प्रकाशित केली. त्याला प्रतिसाद फारसा नव्हता. त्यातून पुढे याची वेबसाईट सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. 2009 साली वेबसाईट सुरू केली. 2010 साली महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. त्यावेळी शासनाने मराठी संकेतस्थळ स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत या संकेतस्थळाला पारितोषिक मिळालं. हे सगळं ठरवून झालं नाही. घडत गेलं.

आपल्या नाटय़लेखनाच्या शैलीविषयी सांगा?
– माझ्या दृष्टीने माणसाच्या जगण्यातले सगळे प्रश्न हे मानसिक, बौद्धिक किंवा प्रतिक्रियांचे असतात. मी लिहायला सुरुवात करतो आणि नाटक घडतं. दिसणाऱया समस्या आणि पडणारे प्रश्न यातून विषय सुचतात.मुख्यतः कुठल्याही तात्त्विक आणि मूलभूत प्रश्नांमधूनही विषय सुचतात. उदा. माणसांमध्ये संघर्ष का होतात, हिंसा का होते? बरोबर वागणं, कृती म्हणजे काय? याच्याशी आपल्या सगळ्या समस्या निगडित आहेत. त्यामुळे अनुभव, वाचन, माहिती याद्वारे मनात जे असतं ते त्याभोवती जमायला लागतं. त्यातून नाटय़लेखन प्रक्रिया घडते.

वाचक, कलाकार आणि रंगकर्मींना आपल्या संकेतस्थळाचा कसा फायदा होईल?
– बरीचशी नाटकं संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे त्यांना निवडीला सोपं होईल. निरनिराळ्या कारणांनी लोक नाटक शोधत असतात. ते शोधायला नाटकं, एकांकिका सहज एका क्लिकवर उपलब्ध आहेत. तसेच कविता, वैचारिक लेखन सवडीने वाचक कधीही वाचू शकतात. जगातल्या कुठूनही ते सहज मिळेल. फार खर्चिक नाही. फक्त प्रयोग किंवा सिनेमा काढायचा असेल तर मानधन आहे. अभ्यासाला, वाचायला माझ्या परवानगीची गरज नाही.

मोफत लेखन उपलब्ध करून देणारं पहिलं संकेतस्थळ आहे, याबद्दल लेखक म्हणून काय भावना आहेत?
– संकेतस्थळाचं काम ओघाओघात घडत गेलं. त्यामुळे मी समाधानी आहे. पुस्तकाच्या किमतीही भरमसाठ आहेत. वितरण व्यवस्थेच्या अडचणी आहेत. विक्री करणाऱया लोकांचं मानधन म्हणजे मूळ कलाकृती लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे खूप आहेत. पाचशे, हजाराची आवृत्ती खपायला दहा वर्षे लागतात. अशा अनेक लेखकांच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात हजारभर वाचनालये आहेत, तरीसुद्धा पुस्तकांच्या आवृत्त्या संपत नाही. म्हणजे चांगलं साहित्य आलंय का याकडे लक्ष ठेवून ते विकत घेणं हा प्रकार कमी आहे. त्यामुळे माझं लेखन संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं मला सोयिस्कर वाटतं.

व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटकांविषयी काय वाटतं?
– व्यावसायिक नाटक प्रेक्षकांच्या सवयींना धक्का लागू देत नाहीत. ते त्याच्या मानसिक सवयी सांभाळतं, तर प्रायोगिक नाटक प्रेक्षकांच्या मानसिक सवयींची फिकीर करत नाही. ते आशयांच्या अंगाने जातं म्हणून सर्जक नाटक असतं. सर्जकता म्हणजे स्वतःच्या सवयीतून बाहेर पडून जगण्याचे भान ठेवणे. असं नसेल तर ते करमणुकीचं नाटक असतं किंवा वास्तवदर्शी असतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या