प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढतो, मुंबईकर क्रिकेटपटू सिद्धेश लाडचे मत

कोरोनामुळे ठप्प असलेले क्रीडाविश्व गेल्या काही दिवसांमध्ये रुळावर येताना दिसत आहे. काही ठिकाणी प्रेक्षकांविना स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र खेळ व प्रेक्षक हे समीकरण ‘अतूट’ आहे. क्रीडाप्रेमी, प्रेक्षकांविना खेळाची मजाच निघून जाते. खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर टाळ्या, शिट्ट्यांसह जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावरच आपली कामगिरी उंचावण्याची प्रेरणा मिळते, दबावाखाली संस्मरणीय खेळ करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे मुंबईचा क्रिकेटपटू सिद्धेश लाड याने. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर दिलखुलास बातचीत केली.

ब्रॅन्डन मॅक्कलमचे मार्गदर्शन
केकेआर संघ व्यवस्थापनाकडून लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक ब्रॅन्डन मॅक्कलम यांनी यावेळी खेळाडूंशी संवाद साधला. आयपीएल स्पर्धा होऊ शकते असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये घरी बसून काय करायला हवे याबाबतही त्यांच्याकडून मार्गदर्शन देण्यात आले असे सिद्धेश लाड पुढे म्हणतो.

केकेआरचा कॅम्प ठाण्यात सुरू होता

महाराष्ट्रासह हिंदुस्थानात लॉकडाऊन होण्याआधी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये स्पर्धाही सुरू होती. तसेच कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या संघाचा कॅम्प ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरू होता. स्थानिक क्रिकेटपटूंसाठी या स्पेशल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सराव करीत होतो असे सिद्धेश लाड नमूद करतो.

इंग्लंड – वेस्ट इंडीज सामन्याने दिलासा मिळाला
इंग्लंड व वेस्ट इंडीज सामना सर्व नियमांसह पार पडला. लॉकडाऊननंतर क्रिकेट पुन्हा सुरू झाले. या सामन्याने मोठा दिलासा मिळालाय. आता आयपीएल व स्थानिक मोसमही खेळवण्यात येऊ शकतो असे ठामपणे वाटू लागले असे उद्गार सिद्धेश लाडने यावेळी काढले.

मुंबईला रणजी जेतेपद मिळवून द्यायचेय
गेल्या तीन मोसमांत रणजी स्पर्धेत मुंबईला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हे अपयश पुसून टाकायचे आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत सर्वस्व पणाला लावून खेळीन. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व सहकारी यांच्या साथीने मुंबईला रणजी चॅम्पियन बनवणारच असा विश्वास सिद्धेश लाड याने व्यक्त केला.

हिंदुस्थानसाठी खेळण्याचे स्वप्न
मुंबईसाठी वर्षानुवर्षे खेळतोय. हिंदुस्थान ‘अ’ संघासाठीही खेळलो. मुंबई असो किंवा हिंदुस्थान ‘अ’ या दोन्हीकडून खेळताना आपला ठसा उमटवता आलाय. आता हिंदुस्थानच्या सीनियर संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आगामी आयपीएल व स्थानिक मोसमांत पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून टीम इंडियाचे तिकीट बुक करण्याकडे माझा कल असणार आहे, असे सिद्धेश लाड आवर्जून म्हणतो.

फिटनेसचा ‘असाही’ सराव

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्यांदा वाटले हा लॉकडाऊन मोठा नसेल, पण त्यानंतर कोरोना वाढत गेला. हे लवकर संपणार नाही हेही जाणवू लागले. त्यानंतर मित्राकडून जिमची काही साधनं मागवून घेतली. त्यानंतर बिल्डिंगच्या टेरेसवर दररोज नित्यनियमाने सराव केला. एवढेच नव्हे, तर मी १४व्या फ्लोअरवर राहतो. दिवसाला चार ते पाचवेळा खाली-वर करून फिटनेसचा सराव करीत होतो. मार्वेâटला गेल्यानंतरही १४ मजले उतरून पुन्हा तेच मजले चढून घरी जात असे, असे सिद्धेश लाड यावेळी आवर्जून सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या