
>> देवेंद्र भोगले
आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृतच. जन्मलेल्या बाळाचा तोच संतुलित आणि सर्वोत्तम आहार असतो. आईचे दूधच त्याला जगवते, रोगप्रतिकारक शक्ती देते. अनेक नवजात अर्भकांच्या नशिबी काही कारणास्तव आईचे पुरेसे दूध येत नाही. आईच्या दुधाअभावी हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 15 लाख बालके दगावतात. त्या परिस्थितीत मातृदुग्धपेढीचे महत्त्व अधोरेखित होते. मातृदुग्धपेढीतले दूध अशा बालकांसाठी जीवनामृत ठरते. मातांनी दान केलेले दूध या पेढीमध्ये साठवून आवश्यकतेनुसार बालकांना दिले जाते. आशियातील पहिली मातृदुग्धपेढी 27 नोव्हेंबर 1989 रोजी मुंबईच्या शीव रुग्णालयात सुरू झाली. या पेढीचे कार्य तेव्हापासून अविरत सुरू आहे. नुकतेच या पेढीचे अद्ययावतीकरण झाले. त्यासंदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. जयश्री मोंडकर यांच्याशी साधलेला संवाद…
– आईच्या दुधाचे महत्त्व काय?
– आईचे दूध म्हणजे बाळाचा सर्वोत्तम आहार आहे. आईच्या दुधातील प्रत्येक घटक बाळाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते. बाळाच्या वाढीसाठी विविध पोषक द्रव्ये त्यात असतात. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. माणूसच नाही, तर प्रत्येक प्रजातीमध्ये आईच्या दुधाला महत्त्व आहे.
– आईचे दूध न मिळणाऱ्या बाळांना दुसरा पर्याय काय?
– आईच्या दुधाला खरं तर पर्यायच नाही, पण आई आजारी असेल, तिला दूध येत नसेल तर गाय, म्हशीचे दूध बाळाला दिले जाऊ शकते, पण आईच्या दुधातून मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती त्या दुधातून त्या प्रमाणात मिळत नाही. त्यासाठी दुसऱ्या आईचे दूध हाच उत्तम पर्यायच नव्हे, तर रामबाण उपायही ठरतो.
– मातृदुग्धपेढीची गरज केव्हा निर्माण झाली?
– आई आजारी असेल, बाळाचा जन्म मुदतीपूर्वी झाला असेल, त्याचे वजन कमी असेल, प्रसूतीनंतर काही आणीबाणी उद्भवली आणि त्यामुळे आईला बाळाला स्तनपान करता येत नसेल, जुळ्या किंवा त्यापेक्षा जास्त बाळांना जन्म दिला असेल किंवा संपूर्ण बधिर करून सिझेरियन शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा परिस्थितीत बाळाची आईच्या दुधाची गरज पूर्ण होत नाही. त्याला दुसऱ्या आईचे दूध संजीवनी ठरते. अन्यथा दुधाअभावी त्याचा मृत्यू ओढवू शकतो. असे मृत्यू टाळण्यासाठीच मातृदुग्धपेढीची संकल्पना जन्माला आली.
– मातृदुग्धपेढीचे काम कसे चालते?
– रक्तपेढीसारखीच मातृदुग्धपेढीची संकल्पना आहे. स्वतःच्या बाळाची गरज पूर्ण केल्यानंतर आई तिचे अतिरिक्त दूध स्वेच्छेने या पेढीला दान करू शकते. असे दूध घेण्यापूर्वी त्या आईच्या एचआयव्ही, हेपेटायटिस व अन्य आवश्यक चाचण्या केल्या जातात. त्या नॉर्मल आल्यानंतरच संबंधित महिलेचे दूध स्वीकारले जाते. दुग्धपेढीत आलेल्या दुधावर प्रक्रिया करूनच ते बाळांना दिले जाते.
– दुग्धपेढीत नेमकी काय प्रक्रिया होते?
– शीव रुग्णालयाच्या दुग्धपेढीचे नुकतेच अद्ययावतीकरण करण्यात आले. त्यासाठी ‘फिलिप्स इंडिया’ ही कंपनी आणि ‘पाथ’ या संस्थेने सहकार्य केले आहे. फिलिप्सने अद्ययावत यंत्रे दिली आहेत. दुग्धपेढीत येणारे दूध मशीनमध्ये 62.5 सेल्सियस तापमानात 30 मिनिटे गरम केले जाते. नंतर ते थंडही करण्याची प्रक्रिया मशीनमध्ये होते. त्यामुळे दुधाचे निर्जंतुकीकरण होते. त्यानंतरही हाताळताना दुधात जंतू राहू शकतात म्हणून पुन्हा एकदा त्या दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.
– दुग्धपेढीतले दूध बाळांना कसे पुरवले जाते?
– पाश्चरायझेशनपूर्वी आणि नंतर अशी दोनवेळा दुधाची मायक्रोबायोलॉजी चाचणी केली जाते. पाश्चरायझेशननंतर बाटल्यांमधील दूध भरून ओळखीसाठी त्यांची नोंद केली जाते. त्या बाटल्या शीतपेटीत मायनस 20 डिग्री तापमानात ठेवल्या जातात. तत्पूर्वी प्रत्येक बाटलीतील काही थेंब घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जातात. नॉर्मल रिपोर्ट आलेल्या दुधाच्या बाटल्या दुसऱ्या शीतपेटीत हलवल्या जातात. त्यातूनच मग मागणीप्रमाणे बाळांना दूध पुरवले जाते.
– किती दिवस दूध साठवता येते?
– दुग्धपेढीमध्ये निर्जंतुकीकरण केलेले दूध सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येते, पण तितकी गरज भासत नाही. कारण शीव रुग्णालयासारख्या मोठय़ा रुग्णालयात जिथे वर्षाला 14 हजार प्रसूती होतात, तिथे दुग्धपेढीतील दुधाचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. 380 लिटर दूध साठवण्याची या दुग्धपेढीची क्षमता आहे. रोजची मागणी सुमारे 200 लिटर दुधाची आहे. इतर रुग्णालयांतील बालकांसाठी दूध लागले तरी ते पुरवले जाऊ शकते.
– आईला दूध न येण्याचे कारण मानसिक?
काही महिलांना बाळाला जन्म दिल्यानंतर पान्हा फुटत नाही, दूध येत नाही यामागचे खरे कारण हे मानसिक असते. मातेची मानसिक स्थिती चांगली नसेल तर तिला पान्हा फुटत नाही आणि फुटला तरी पुरेसे दूध लागत नाही. अशा मातांना तज्ञांकडून समुपदेशन दिले जाते. त्यांना ‘लॅक्टेशन कौन्सिलर’ असे म्हटले जाते. बाळाला स्तनपान कसे करावे त्याची पद्धतही मातांना शिकवली जाते.



























































