
>> मुलाखत – मेधा पालकर
हवेला कोणत्याही मर्यादा नाहीत. तिची स्थिती कोणत्याही चौकटीत आपण बांधू शकत नाही. ती बदलत राहते, पण ती स्थिती आणि हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱया मानवी हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वृक्षतोड, प्रदूषण, निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेला विध्वंस… या सर्वांचा परिणाम आपल्याला ऋतुमानात दिसतो आहे…- डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानतज्ञ

सध्या जी उष्णतेची लाट आली आहे ती कशामुळे?
– 24 ते 29 एप्रिल या काळात हिंदी महासागरात दोन चक्रीवादळे तयार झाली. दक्षिण गोलार्धात तयार झालेले लोराना हे वादळ सध्या शमले असेल, तरी त्या काळात ते सक्रिय होते. त्याचवेळी उत्तर गोलार्धात जे फनी वादळ तयार झाले ते अजूनही सक्रिय आहे. त्याचा परिणाम या वाढलेल्या तापमानात दिसून येतो. सध्या दोनपैकी एकच फनी वादळ सक्रिय आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात वाढलेल्या तापमानात किंचीत घट झालेली दिसून येते. पण जोपर्यंत वादळ आहे तोपर्यंत उष्णतेची लाट जाणवत राहील. या वादळांमुळे हवेला उर्ध्वगती मिळते. वरून खाली जेव्हा हवा वाहू लागते तेव्हा उष्णता जास्त जाणवते. मुळात उन्हाळय़ात उष्णता असतेच ती वादळांमुळे आणखी जाणवते त्यामुळे उष्णतेची लाट आली असे आपण म्हणतो.
ऋतुमान बदलत आहे, उन्हाळय़ात खूपच ऊन, थंडीत खूपच थंडी हे कशामुळे जाणवत आहे?
– आपल्याकडे 1980 नंतर ग्लोबल वॉर्मिंगला सुरुवात झाली, त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागला. सध्या जे हवामान बदललेले दिसत आहे ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे आहे. मार्च ते मे हे उन्हाळा ऋतूचे महिने आहेत. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा येथे उन्हाळा कडक जाणवतो. कारण सूर्याचे संक्रमण विषवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे होत आहे. आकाश निरभ्र असेल तर उष्णता जास्त जाणवते. पण ढगाळ वातावरण असेल तर सूर्याची किरणे अडकतात आणि उष्णता जमिनीवर पोहोचत नाही. जमीन तापत नाही. जरी वरून खाली वाहणाऱया वाऱयांमध्ये उष्णता असली तरी ती कमी जाणवते. त्यामुळे उन्हाळा जास्त जाणवतो. पण तो अति जाणवण्याचे कारण म्हणजे वारेमाप वृक्षतोड आणि त्यावेळीची हवेची स्थिती यामध्ये आहे. हवेला कोणत्याही मर्यादा नाहीत. तिची स्थिती कोणत्याही चौकटीत आपण बांधू शकत नाही. ती बदलत राहते. पण ती स्थिती आणि हवामान बदलाला कारणीभूत ठरणारा मानवी हस्तक्षेप याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वृक्षतोड, प्रदूषण, निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेला विध्वंस या सर्वांचा परिणाम आपल्याला ऋतुमानात दिसतो आहे.
दुष्काळाचा परिणामही यंदाच्या उन्हाळय़ावर दिसतो आहे, तो कसा काय?
– गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी पडला की, जमिनीत बाष्प राहात नाही. बाष्प असेल तर जमीन कमी तापते. विदर्भात गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे जमिनीत पाणी जिरले नाही. त्यामुळे बाष्पही कमी. जमीन खूप तापते. त्याचा परिणाम त्यावर्षी येणाऱया उन्हाळय़ा ऋतूवर दिसतो. जमिनी बाष्प कमी पडले की, उन्हाळय़ात ती आणखी तापत राहते. शिवाय झाडे तोडली की, सावली नाही. सावली नसल्यानेही जमीन तापायला लागते.
पूर्व मान्सून जेव्हा सुरू होतो तेव्हा गारा, विजा पडण्याच्या घटना घडतात, अलीकडे हे प्रकार कोकणातही घडले हे कशामुळे?
– मार्च ते मे या काळात जो पाऊस पडतो त्याला हवामानाच्या भाषेत प्री मान्सून असे म्हणतात. मान्सून पूर्व वादळी पाऊस असेही म्हटले जाते. या काळात ढगांची निर्मितीही खूप उंचीपर्यंत होत राहते. ही उंची पाच किलोमीटरच्या वर जायला लागते तेव्हा ढगांचे तापमान कमी होते. ते शून्य डिग्रीच्या खाली गेले की ढगातील पाण्याचे रूपांतर बर्फात होऊन गारा पडतात. या काळात गारा घासून विजांची निर्मिती होते. धन आणि ऋण भार तयार होतो. त्यातून हवेचे प्रसरण होऊन पाऊस आणि विजांचा कडकडाट होतो. सध्या कोकणातही गारा पडण्याच्या घटना घडत आहेत, कारण बऱयाच उंचीपर्यंत ढगांची निर्मिती होत आहे. ढगांच्या निर्मितीला हवेची स्थिती कारणीभूत आहे.
यंदाचा पाऊस कसा राहील?
– आयएमडीने पावसाचा सरासरी अंदाज 96 टक्के दिला आहे. सुधारित अंदाज काही दिवसांत दिला जाईल. या अंदाजामध्ये 5 टक्के अनिश्चितता असते. म्हणजे तो एकतर 91 टक्के पडेल किंवा 101 टक्केही असू शकतो. पाऊस 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर दुष्काळी स्थिती असते. पण या वर्षीचा सरासरी पावसाच्या अंदाजावरून तो सामान्यस्थितीचा राहील असे म्हणता येईल. सरासरी तो भरून काढत जरी असला तरी पावसाळय़ाचे चार महिने तो कसा पडतो, त्याचे वितरण कसे होते हे महत्त्वाचे ठरेल. चार महिन्यांत त्याचे वितरण चांगले राहिले तर ते पिकांसाठी चांगले राहील. पण अगदी शेवटच्या महिन्यात खूप पडला तर अतिवृष्टीची स्थिती होते. असा पाऊस जमिनीत साठत नाही. ते पाणी वाहून जाते. त्यामुळे हा सरासरी अंदाज धरणे भरण्यासाठी दिलेला असतो. शेतकऱयांसाठी चार आठवडय़ांचा अंदाज दर महिन्याला देण्यात येतो. त्यानुसार त्यांनी पिकांचे नियोजन करावे.
हवामानाच्या अंदाजात अचूकता येण्यासाठी काय केले पाहिजे?
– आपल्याकडे हवामानाचा अंदाज देताना गणिती मॉडेल म्हणजेच प्रारूपांचा आधार घेऊन तो दिला जातो. या मॉडेलमध्ये आपल्याकडे हवामान आणि त्यावेळेची स्थिती बदलली तर अचूक अंदाज देता येत नाही. पण स्थिती कायम असेल तर अंदाज बरोबर येतात. कारण हवेचे चलनवलन स्थिती ही विशिष्ट मर्यादेत बांधता येत नाही. त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांमध्येही अचूक अंदाज दिला जात नाही. दिला तरी अंदाज आणि प्रत्यक्ष स्थितीत बदल असतो. अंदाज हा जागरूकता आणि नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. पण तो प्रत्येकवेळी चुकेलच असे नाही. अंदाजाकडे संदेश म्हणून पाहिले पाहिजे.
























































