ऑलिम्पिकच्या तिकिटासाठी धडपड, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे हिचे लक्ष्य

297

कोरोनामुळे टेबल टेनिस या खेळाला अजूनही सुरुवात झालेली नाही. हिंदुस्थानातील अल्टिमेट टेबल टेनिस लीग ही स्थगित करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनकडूनही आगामी स्पर्धांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आहे. खेळाडूंना सरावासाठी आणखी वेळ मिळालाय. आता खेळाडूंना सराव व स्पर्धांची प्रतीक्षा लागून राहिलीय. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे/कोपरकर हिच्याशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, वयाच्या नवव्या वर्षापासून टेबल टेनिस खेळतेय. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करता आलेय. आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचेय, पण जगातील मानाच्या क्रीडा महोत्सवात देशातील एक किंवा दोनच खेळाडू सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या स्पर्धेचे तिकीट मिळवणे खूपच अवघड आहे. तरीही ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे तिने आत्मविश्वासाने पुढे सांगितले.

बहिणीमुळे टेटेकडे पावले वळली
माझी मोठी बहीण शैलजा गोहाड यांच्या बुस्टर्स ऍकॅडमीत टेबल टेनिसच्या सरावाला जात होती. घरामध्ये एकटी राहून कंटाळा येत होता. त्यामुळे मीही तिच्यासोबत त्या ऍकॅडमीत जाऊ लागली. सुरुवातीला या खेळामध्ये तितकासा रस नव्हता. प्रत्यक्षात खेळू लागल्यानंतर आवडायला लागले. शैलजा गोहाड मॅडमने माझ्या पालकांना बोलावून माझ्या टेटेमधील गुणांबाबत सांगितले. तेव्हा मी नऊ वर्षांची होती. तिथपासून सुरू झालेला प्रवास आता 28व्या वर्षीही नॉनस्टॉप सुरूच आहे, असे पूजा सहस्रबुद्धे यावेळी म्हणाली.

अल्टिमेट लीगमुळे फायदा झाला
गेल्या काही वर्षांपासून अल्टिमेट टेटे लीगचे आयोजन हिंदुस्थानात करण्यात येत आहे. या लीगमुळे हिंदुस्थानी खेळाडूंचा फायदा झाला आहे. या लीगमध्ये जगभरातील खेळाडूंचा सहभाग असतो. आशियातील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया देशांतील खेळाडूंचा यामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या सरावाबाबत जाणून घेता आले तसेच हिंदुस्थानी खेळाडूंना आर्थिकदृष्टय़ा आणखी मजबूत होता आले, असे पूजा सहस्रबुद्धे यावेळी म्हणते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई
मी 2004 साली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले. त्यानंतर 2008 सालातील युथ कॉमनवेल्थमध्ये रौप्य (दुहेरी), 2013 सालातील मोरोक्को ओपनमध्ये कास्य पदक (एकेरी), 2016 सालातील वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सेकंड डिव्हिजनमध्ये सुवर्ण पदक (महिला सांघिक), 2017 सालातील ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये कास्य पदक (दुहेरी), 2018 सालातील कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक (महिला सांघिक) आणि सॅफ गेम्समध्ये दोन सुवर्ण पदके जिंकण्यात यश लाभले, असे सांगताना पूजा सहस्रबुद्धे भावुक झाली होती.

टेटे खेळायला मिळाले नाही, पण…
कोरोनाच्या काळात टेटे खेळायला मिळाले नाही, पण फिटनेसचा सराव केला. हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. कारण आमच्या खेळात वेगवान हालचाली महत्त्वाची भूमिका बजावतात. टेटेमध्ये क्षणाक्षणाला गोष्टी घडून जातात. त्यामुळे मानसिक व शारीरिक सक्षम होण्याकडे लक्ष दिले. त्यामुळे इतका काळ टेटे खेळता आले नसले तरी जेव्हा प्रत्यक्षात खेळायला सुरुवात करीन तेव्हा चांगलाच खेळ करीन, असा आत्मविश्वास पुढे पूजा सहस्रबुद्धे हिने व्यक्त केला.

लॉकडाऊनमध्ये स्वतःचे वेळापत्रक तयार केले
मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा लॉकडाऊन किती काळ चालेल याबाबत काहीच माहीत नव्हते. थोडय़ा दिवसांनंतर स्वतःचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार सराव करीत गेले. माझे पती अनिकेत कोपरकर हे माझे प्रशिक्षक आहेत. या कालावधीत मेडिटेशन, व्हिडीओ पाहणे, जुन्या मॅचेस पाहणे हे आवर्जून केले. याचदरम्यान वेबिनारही अटेण्ड केले. मी जिथे नोकरी करते, त्या ओएनजीसी कंपनीकडूनही ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले, असे पूजा सहस्रबुद्धे यावेळी सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या