विशेष मुलाखत – स्पेशल बॉण्ड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पुष्कर जोग, अभिनेता

कोरोनाच्या रुपाने एकढं मोठं संकट आपल्यासमोर उभं राहील, याची कधी कुणी कल्पना केली नसेल. आपण सारे त्याला धैर्याने सामोरे जात आहोत. ‘बिग बॉस’ कार्यक्रमात मी 100 दिवस क्वारंटाईनमध्ये होतो. एक प्रकारे क्वारंटाईनची सवय झाली होती. त्यामुळे आता फार त्रास झाला नाही. तसा माझ्यात संयम चांगला आहे. सुरुवातीचे तीन – चार महिने ‘ओके’ वाटले. पण आता मात्र ‘बस्स’ म्हणावंस वाटतंय. बाहेर जाऊन कामं करूया, असं वाटायला लागलेय. पण संकट अजून टळलेले नाही. खूपच खबरदारी घेऊन, आरोग्याची काळजी घेऊन एकेक पाऊल टाकावं लागणार आहे, याची जाणीव आहे.

कोरोनाने सर्वांना एका पातळीवर आणलंय. कुणी मोठा नाही, छोटा नाही. आपल्याला घरच्यांची खरी किंमत कळायला लागलेय. माझ्याबाबतीत सांगायचं तर मी कुटुंबासोबत खऱया अर्थाने जगलो. म्हणजे कामानिमित्त, दौऱ्यानिमित्त त्यांच्यापासून दूर असायचो. आता मला बेबीसोबत खूप वेळ घालवता आला. नवीन खेळ, ड्रॉईंग-पेंटिग करू शकलो. आमच्यातील ‘बॉण्ड’ आणखी ‘स्पेशल’ झाला.

लॉकडाऊनच्या दिवसात मी स्वत:ला मानसिकदृष्टय़ा गुतंवून ठेवलं. कथा लिहिल्या, कविता केल्या, भरपूर वाचलं. वर्कआऊट कधी सोडला नाही. आठवडय़ातून एक-दोनदा डान्स करतो. माझी चिमुरडी लेक, फेलिशा पण त्यात सहभागी होतो. या सगळ्यांमुळे छान वाटतं.

दिवस असे आहेत की लोकांना नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण यातून त्यांना बाहेर वाढण्यासाठी आनंद देण्यासाठी आम्हा कलाकार मंडळीनी घरातूनच बऱयाच क्रिएटिव्ह गोष्टी गेल्या. मी कधी रॅपिंग, कधी गाणी, कविता यातून मनोरंजन करत राहिलो. नुसतं मनोरंजन नव्हे तर सामाजिक भान जपण्याचे आवाहन करत राहिलो.

मी युट्युब चॅनेल सुरू केलंय. व्हिडियो ब्लॉगिंग स्वरूपात आहे. मला असं वाटत की फॅन्सपर्यंत पोचण्याचं ते चांगलं माध्यम आहे. तुम्हाला माहित असेलच मी डान्सर म्हणून करियरला सुरुवात केली. यु टय़ुब चॅनेलवर सध्या तरी मी सात- आठ एपिसोड केलेत. ‘ऍज अ डान्सर’ म्हणून तुम्ही काय करू शकता… मग शूटींगच्या आधी काय होतं… कलाकार कशी तयारी करतो. माझं वर्कआऊट कसं असतं? प्रवास करताना मी काय करतो. हे सगळं व्हिडियोच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोचवतो.

शेवटी एवढंच सांगेन 2020 हे वर्ष सगळ्यांना खूप अवघड गेलंय. त्यातून आता आपण सावरतोय. खूप सकारात्मक रहा, प्रेम पसरवा, खूश रहा. स्वत:ची काळजी घ्या.
काम सुरूच…

l लॉकडाऊनच्या काळात थांबलेले काही प्रोजेक्ट आता सुरू झाले. वेल डन बेबी नावाचा सिनेमा येतोय. मी अमृता खानविलकर, वंदना गुप्ते अशी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट 12 जूनला प्रदर्शित करणार होते. लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रोडक्शन करता आलं नव्हतं. आता जुलैमध्ये चित्रपट तयार झालाय. लवकर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘मन सुनं’ नावाचा सिंगल अल्बम स्मिता गोंदकर सोबत केलाय. एमएक्स प्लेयरवर नुकतीच आमची ‘ईडियट बॉक्स’ वेबसीरीज आलेय.