
>> मिलिंद शिंदे
सई परांजपे. हाडाच्या दिग्दर्शक. शिक्षकच म्हणूया हवं तर… कारण त्यांनी फक्त चित्रपट दिग्दर्शित केला नाही तर अनेक कलावंत अक्षरशः घडवले.
‘‘वर्तमानपत्र पेपर नाही…’’ सई परांजपे मॅडम यांनी आमच्या एका सहकलाकारावर नाराजी व्यक्त केली. ‘‘वर्तमानपत्र… आणि पेपरच असेल तर तो फक्त कागद आहे, वर्तमानपत्र त्याला इंग्रजीमध्येच म्हणायचं असेल तर तो न्यूजपेपर आहे.’’ तुषार गायकर नावाचा आमचा उमदा आणि अतिशय शिस्तीचा कलाकार थोडा ओशाळला आणि त्याच्यासह आम्हा इतर कलाकारांनाही एक नवा धडा मिळाला भाषेचा, चिकित्सकतेचा. किती सहज घेतो ना आपण शब्दांना? त्यांची किंमत न तोलता, त्यांचं भाषांतरित वजन न जोखता जिभेवर येतं आणि आपण ते वाक्य, तो शब्द वातावरणात फेकून देतो. अर्थाअनर्थाची पर्वा न करता, पण सई परांजपे मॅडमनी त्या शब्दाचं मूल्य तोलून मापून, जोखून दाखवलं त्या दिवशी आणि असे अनेक प्रसंग नाटकाच्या तालमीदरम्यान घडले.
नाटकाचं नाव ‘आलबेल’, निर्मिती संस्था एनसीपीए, दीपा गेहलोत कार्यकारी निर्माता, लेखक-दिग्दर्शक सई परांजपे. त्या नाटकाच्या तालमीदरम्यान घडलेला हा प्रसंग.
जां पॉल सार्त्र यांचं ‘नो एक्झिट’ नाटक काही केल्या मॅडमच्या मनातून जात नव्हतं. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनी ते नाटक दिल्लीत मंचित करण्याचा प्रयत्न केला. ते काही कारणाने रहीत झाले, पण सार्त्र मॅडमच्या मनात घर करून राहिला, ‘नो एक्झिट’ नाटकातली पात्रं मनात घोळू लागली आणि माणूस याहूनही वेगळा, खरं तर चांगला असू शकतो असं त्यांना वाटलं. माणूस एकमेकाला साथ देऊ शकतो, ‘अवघे धरू सुपंथ’चा एक आविष्कार नाही होऊ शकत का? त्यातून जन्म घेतला सई परांजपे यांच्या ‘आलबेल’ या नाटकाने. त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर हे नाटक लिहायला त्यांना म्हटलं तर चाळीस वर्षे लागली किंवा चार दिवस लागले. कारण त्यांनी हे नाटक चारच दिवसांत लिहून पूर्ण केलं. सई परांजपे हे नाव गुगलवर टाईप करा, आपल्याला त्यांचा सगळा बायोडाटा मिळेल, पण बायोडाटात विणलेल्या आणि वेबच्या वेष्टनापलीकडच्या मनस्वी, मनोज्ञ, उत्स्फूर्त कलावंताला गुगलमध्ये कसं शोधाल? (अर्थात ‘गुगल द ग्रेट’ यांचा आदर ठेवून). ‘आलबेल’ नाटकाच्या निमित्तानं मॅडम मला भेटल्या. नाटक, सिनेमातलं कळायला लागल्यापासून, खरं तर वेड लागल्यापासून ज्यांना आपण सतत फॉलो करतो त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, कलाकृतींबद्दल ऐकत असतो, त्यांच्या सोबत मला ‘आलबेल’ नाटकात काम करायला मिळालं, तेही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत.
त्या तालमीत भेटलेल्या मॅडम, भावलेल्या मॅडम या बायोडाटाच्या वेष्टनापलीकडच्या आहेत. त्या पारदर्शी आहेत, स्पष्ट आहेत. आपल्या भूमिकांबद्दल ठाम आहेत.
‘‘का? मुलींना का ऍडमिशन नाही?’’ राष्ट्रीय नाटय़ विद्यालय, दिल्ली इथे जेव्हा प्रवेशाच्या वेळी नकार मिळाला तेव्हा त्यांनी आग्रही राहून त्यांना हा जाब विचारला, ‘‘का नाही?’’
‘‘मुली राहत नाहीत, कोर्स पूर्ण करत नाहीत, लग्न झालं की, निघून जातात.’’ मुलाखतकार…
‘‘मी लग्न करून आलेय.’’
झालं, विरोध मावळला. अर्थात तो काळही तसाच होता. माझं थोडंसं सुख यात आहे की, त्या ज्या शाळेत शिकल्या, राष्ट्रीय नाटय़ विद्यालय, दिल्ली (National school of Drama, Delhi- NSD), मीही तिथलाच विद्यार्थी, पण त्यांच्या समोर अगदीच ज्युनियर.
त्यांच्या धाडसाचा कारवां काही थांबला नाही. मॅडमनी त्या काळी ‘वासनाकांड’ (लेखक महेश एलकुंचवार) या धाडसी नाटकाला हात घातला. त्या काळातलं एक निशाणच ते… नवतेचं, नव्या रंगमंचीय जाणिवेचं, आविष्काराचं.
‘‘जास्वंदी’ गाजलं खूप, पण काही असतात खोडा घालणारे’’ मॅडम म्हणाल्या. ‘‘ते बोके (मांजर) का? कशासाठी? वाटत नाहीत’’ इ.इ. पण सई परांजपे ठाम होत्या. आपल्या मांजरांच्या योजनांबद्दल आणि तो नवा रंगसंस्कार पचनी पाडला त्यांनी टीकाकारांच्या. एकदा मी त्यांना म्हणालो, ‘दिशा’ सिनेमातले नाना पाटेकर जेव्हा संडासात जाऊन रडतात, तो माझा आवडता सीन आहे.’’
क्षणभर थांबल्या मॅडम, पण मी बोललेल्या क्षणापासून ते मॅडम त्या क्षणाच्या शूटिंगच्या वेळेपर्यंत जाईपर्यंतचा प्रवास त्यांच्या निळय़ाभोर (निळय़ाशार) डोळय़ांत पाहत होतो.
थोडं शांत राहिल्या.
‘‘तुम्हाला सांगू मिलिंद… ती कल्पना नानाची, माझी नाही. तो मला म्हणाला की, त्याच्या बायकोबद्दल असं ऐकल्यावर तो रडेल तर कुठे रडेल, तर कामगार वस्तीतल्या संडासात जाऊन रडेल.’’ (‘संडास’ हा शब्द मुद्दाम वापरला आहे. वॉशरूम आणि टॉयलेटला संडासाची सर नाही). मग त्यांनी तो संपूर्ण प्रसंग कसा चित्रित केला ते सविस्तर सांगितलं, पण ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यायला मॅडम विसरत नाहीत कदापिही. मी नेहमी विचार करतो, कलाकाराला सुचतं कुठून? लेखकानं लिहिलेल्या संहितेमधून किंवा दिग्दर्शकानं दिलेल्या माहितीवरून, पण त्याचं श्रेय स्वतःकडं न घेणाऱया मॅडम, तुम्ही वेगळय़ाच आहात, नाहीतर अलीकडं ‘मीच तो’चा होरा सुरू आहे. कला क्षेत्रात नाटकाचे प्रयोग थांबले, भेटणं बंद झालं, पण त्यांच्या ‘सय’ या त्यांच्या वृत्तपत्रीय मालिकेनं पुन्हा भेट घडवून आणली. मी त्या सर्व भागांचं पारायण करीत असे.
काय देखणं आणि लाघवी नाव स्तंभाला… ‘सय’!
‘सय’मधल्या ‘आलबेल’बद्दलच्या लेखात त्या म्हणतात, ‘‘माझं आवडतं नाटक, जे मला वाटतं माझं सगळय़ात उत्तम आहे, तेच नाही चाललं याची मला मनोमन खंत वाटते.’’
जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष या मुद्दय़ावर बोललो, ती हुरहूर, ती सल मी पाहू शकत होतो त्या प्रामाणिक चक्षूंमध्ये, कलाकार स्वतःशी किती प्रामाणिक असावा याचं मूर्त स्वरूप मी पाहत होतो.
तालमींदरम्यान, प्रयोगांदरम्यानसुद्धा मी त्यांचं रॅशनल असणं पाहत होतो. त्या पूजा मांडत नाहीत, हार-फुलं वाहत नाहीत, लोटांगण घालून नमस्कार करीत नाहीत, अंगारे नाहीत, शुभ तारीख नाही. ‘‘तुमची काय श्रद्धा आहे ना, ती पडदा उघडल्यावर आपल्या कामात दाखवा. जिथे पोहोचायची तिथं बरोबर पोहोचते.’’ इतक्या स्पष्ट, इतक्या पारदर्शी, खऱया, शब्दांच्या पक्क्या.
हो, हे तर राहिलंच. ‘आलबेल’च्या तालमींदरम्यान जेवणाची सुट्टी एक तास असे. एक तास म्हणजे साठ मिनिटे. साधारण विसेक मिनिटांत सगळय़ांचं जेवण संपत असे, पण साठ मिनिटे म्हणजे साठ मिनिटे. मॅडमनी आमचा एक तास आम्हाला दिला होता, पण एकसष्टाव्या मिनिटाला ‘‘चला, रेडी!’’ अशी हलकेच नाजूक हाक येणार आणि पुन्हा तालीम सुरू, पण आम्ही त्या साठ मिनिटांत फोन कर, हे कर ते कर, सई मॅडम इंग्रजी शब्दकोडे सोडवत असायच्या.
‘‘मॅडम, मला आपल्या ‘आलबेल’ नाटकाचं पुस्तक पाहिजे, मला द्या.’’ मी
‘‘मी पुस्तक देत नाही. मी पुस्तक विकते. नव्याण्णव रुपयांचं पुस्तक आहे, शंभर रुपये द्या.’’ मी दोनशेची नोट काढून दिली.
त्यांनी मला शंभर रुपये परत केले. एक रुपयासुद्धा…
रँग्लर परांजपे यांच्या नात (रँग्लर परांजपे- रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – 16-2-1876 ते 6-5-1966. 1899 साली ज्यांना केंब्रिज विद्यापीठाची पदवी मिळाली असे ज्ञानी, विद्वान गणितज्ञ) या खरंच उत्तम माणूस आहेत आणि हिशेबाच्या पक्क्याही. मॅडम, तुम्हाला सलाम!
तुम्ही मौल्यवान आहात!




























































