
>> राजेश पोवळे
अंधेरी पश्चिमेतील चार बंगलाजवळच्या रतननगरात गेलो की समोरच दिसते ती बाबा सदन इमारत. या इमारतीच्या तिसऱया मजल्यावर मराठी भावगीतांचा भीष्म पितामह अजूनही संगीताचा पसारा मांडून बसला आहे. मराठी भावगीतात गजाननराव वाटवे यांचे युग सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले. त्याच वाटवे युगाचा सर्वार्थाने शेवटचा शिलेदार अजूनही त्याच तडफेने भावगीतांची नवी पिढी घडवण्यासाठी धडपडतो आहे. भावगीतांचा पितामह म्हणजे बुजुर्ग गायक-संगीतकार गोविंद पोवळे…
गोविंद पोवळे आज वयाच्या एकोणनव्वदीत पदार्पण करीत आहेत. या वयातही हार्मोनियमवर लीलया फिरणाऱया बोटात आणि ‘काळी तीन’चा स्वर लावणाऱया गळ्यात सरस्वतीचा अखंड वास आहे. ‘‘ज्याच्या गळ्यात गाणे, तो भाग्यवंत आहे.. गातो अजून मीही म्हणुनी जिवंत आहे’’ हे त्यांचे ‘सुपरहिट’ ठरलेले गाणे गुणगणत गोविंदरावांनी शतक ठोकण्याचा निर्धार केला आहे.
बाहेर ऑक्टोबर हीट असली तरी गोविंदरावांच्या घरात शीतलता नांदतेय. 89 वर्षांचे ‘तरुण तुर्क’ गोविंदराव त्याच उत्साहाने सगळीकडे वावरताहेत. सोबतीला संवादिनी आहे, कविता आहे, गाणी आहेत. त्यांच्याकडे आकृष्ट झालेल्या पाच हजारांहून जास्त शिष्यवर्ग आहे. पूर्वीच्या काळाच्या हृद्य आठवणी आहेत. सुयोग आणि सूरदास या मुलांचं संगीतातलं यश आहे.
उरणजवळच्या चिरनेरमध्ये 1932 साली जन्मलेल्या गोविंदरावांना संगीताचं बाळकडू मिळाले ते घरातूनच. वडील त्रिंबकराव हे कीर्तनकार आणि मोठे बंधू गोपीनाथराव गायक. संगीत हेच ध्येय ठरवून वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. रेडिओ स्टेशन त्याकाळी धोबीतलावला होते. दिनकर अमेंबल त्यावेळी रेडिओचे काम पाहत. मला ऑडिशनची संधी द्या, माझा स्वर काळी तीन आहे, असे पोरसवधा गोविंदाने त्यांना सांगितले. रेकॉर्डिंग स्टुडिओचा लाल लाईट लागला आणि गोविंदरावांनी गदिमांचे एक गाणे म्हटले, ‘कशानं बाई गं काजळाला हात…’ पण लाल लाईट लगेच बंद झाला. गोविंदरावांना वाटले आपण नापास झालो, पण अमेंबल धावत आले आणि म्हणाले आम्हाला खूप चांगला गायक मिळालाय… तिथून सुरू झालेला गोविंदरावांचा संगीतप्रवास आजही अखंड सुरू आहे.
30 मार्च 1948 रोजी गोविंदरावांचा पहिला कार्यक्रम रेडिओवर झाला. रेडिओवरचे ते सर्वात लहान कलाकार. त्यावेळी उस्ताद अल्लारखाँसाहेब रेडिओवर असायचे. ‘आई ये मेरे छोटे आर्टिस्ट’ असे ते गोविंदरावांना म्हणायचे आणि तबलासाथही करायचे… ‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी… गोल असेही दुनिया आणिक गोल असे रुपया… रात्र काळी, घागर काळी… यमुना जळीही काळी हो माय… धागा धागा शोधित फिरशी को वेडय़ा उन्हात, अखेर तुजला जागा लागे साडेतीन हात…’ ही गोविंदरावांची गाणी महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय झाली. एचएमव्ही ग्रामोपह्न कंपनीने त्याच्या तबकडय़ा काढल्या, त्या हातोहात विकल्या गेल्या. त्यातील ‘माती सांगे पुंभाराला’ हे गाणे तर मिलेनियम साँग्जमध्ये समाविष्ट केले गेले. सलग 70 वर्षे आकाशवाणीवर गाण्याचा विक्रम गोविंदरावांच्या नावावर जमा आहे.
माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, जानकी अय्यर, पुष्पा पागधरे, नलिनी मुळगावकर, प्रमोदिनी देसाई यांनी गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली गाणी गायली. त्या काळात महाराष्ट्रात भावगीतांचा वन मॅन शो करणारे फक्त सातच जण. गजानन वाटवे, सुधीर फडके, आर. एन. पराडकर, दशरथ पुजारी, विठ्ठल शिंदे, दत्ता वाळवेकर आणि मी… आणि आमची भावगीतं महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती… सांगताना गोविंदराव जुन्या आठवणीत हरवून गेले होते.
पंडित पलुस्कर आणि पोवळे
शास्त्रीय रागदारीच्या परीक्षेची पद्धत पंडित दिगंबर विष्णू पलुस्करांनी सुरू केली. भावगीतासाठी मात्र असा कोणताही अभ्यासक्रम आणि परीक्षा नव्हती. मग पुढे भावगीताची अभ्यासपूर्ण बैठक नष्ट होईल की काय, या विचाराने गोविंदरावांनी भावगीताचा अभ्यासक्रम बनवला. त्याचे प्रशिक्षण सुरू केले. परीक्षाही घेण्यास सुरुवात केली. त्याला आजही महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. पंडित पलुस्करांनंतर संगीताचा अभ्यासक्रम बनवण्याचे श्रेय निर्विवादपणे गोविंदराव पोवळे यांचेच. 48 परीक्षा केंद्रांतून आजवर पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिल्या आहेत. 8 वर्षांपासून 80 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी त्यात आहेत. आजच्या पिढीकडून भावगीताला मिळणारी ही दाद पाहून जाणवलं की भावगीताचा झेंडा फडकत राहणार आहे. तो पेलून धरणारे हात फक्त बदलत आहेत. हे सांगताना गोविंदरावांच्या डोळ्यांत दिसते ती कृतार्थतेची भावना.
सरकार दखल कधी घेणार?
भावगीताच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱया गोविंदरावांनी सामाजिक भानही जपले. शेकडो गरीब व होतकरू मुलांना विनामूल्य संगीत शिक्षण दिले. अपंगांना मदत करणाऱया संस्थांसाठी आणि सरकारच्या कामगार कल्याण केंद्रासाठी स्वतः पुढाकार घेऊन कार्यक्रम केले. चीनने हिंदुस्थानवर केलेल्या आक्रमणात जनजागृतीसाठी गोविंदराव पायाला भिंगरी लावून गावोगाव प्रचारगीत गात फिरले. प्रभात फेऱया काढल्या. शाळांच्या मदतीसाठी विनामूल्य ्यक्रम केले. सरकारने मात्र याची साधी दखलही न घेतल्याची खंत गोविंदरावांनी व्यक्त केली. सरकारला माझ्या कामाबद्दल काही वाटले तर ठीक, पण मी स्वतःहून पुणाकडे काहीही मागणार नाही. माझे गाणे खणखणीत बंद्या रुपयासारखे रसिकांच्या दरबारात वाजले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

























































