रंगपट – स्मिताताई आणि माझ्यातली आई!

आयुष्याच्या वाटेवर चालताना, मनात रुतलेल्या आठवणींना उजाळा देत आहे अभिनेत्री सुलेखा तळवलकर.

आकाश अगदी निरभ्र असावे, साऱया आसमंताने सुखाची चादर लपेटून सुखस्वप्नात रंगून जावे अशी स्थिती असताना अचानक आकाशात काळेभोर ढग जमावेत, विजांच्या कडकडाटासह झोडपून काढणारा पाऊस सुरू व्हावा आणि सारे वातावरण ढवळून निघावे असेच काहीसे आमच्या आयुष्यात घडले. स्वतः आनंदी जीवन जगत, आनंदाची उधळण करणाऱया, कामाचे 24 तास नव्हेत; तर 48 तास असावेत अशा पद्धतीने काम करणाऱया माझ्या सासूबाई म्हणजे स्मिता तळवकर! मी त्यांना ‘काकी’ म्हणायचे. त्यांना केवळ पोटदुखीचे निमित्त झाले. उपचार सुरू झाले आणि डॉक्टरांनी चक्क कॅन्सरचे निदान केले. घरादारावर वीज कोसळावी आणि सगळे जमीनदोस्त व्हावे तसेच काहीसे झाले. तशातच घरात 80 वर्षांचे नाना, म्हणजे स्मिताताईंचे वडील होते. माझी मुले आर्य व टीया तेव्हा लहान होती. माझ्या मालिका, सिनेमा जोरात सुरू होते. आईवेडा अंबर तर अगदीच सैरभैर झाला होता. आलेल्या या संकटाला सामोरे जात, जीवन कसे सुसह्य करायचे याचे भान आता मलाच ठेवायचे होते. मी तडकाफडकी माझे काम थांबवण्याचा निर्णय घेतला.

माझ्या माहेरी आमचे तिघांचे कुटुंब होते. मला एकत्र कुटुंब आवडत होते म्हणून मी अंबरसोबत लग्न करून तळवलकरांच्या एकत्र कुटुंबात आले. माझ्या आईची आणि सासूबाईंची एक शिकवण होती की सर्वप्रथम आपले कुटुंब आणि मग नंतर सर्वकाही! नानांना अजिबात कळू न देता काकींची ट्रीटमेंट सुरू झाली. आपल्या लाडक्या आजीला काहीतरी झाले आहे हे आर्य व टीयाला जाणवत होते. आर्यने तर स्वतःची बेडरूम सोडली आणि तो आजीला सोबत करू लागला. आजीची जणू तो सावलीच झाला होता.

माणूस फक्त नावानेच नाही, तर मनानेही तो मोठा असावा लागतो. एकीकडे काकी असाध्य रोगाशी लढत होत्या. पण तेव्हाही त्या कॅन्सरशी झुंज देणाऱया इतर स्त्र्ायांना आधार देत होत्या. अनेक संस्थांना त्या भेटत होत्या. त्यातून अनेकांना उभारी मिळाली. पण काळ कुणासाठीही थांबत नाही. 2014 या वर्षी स्मिता तळवलकर अनंतात विलीन झाल्या आणि आम्ही पोरके झालो.

माझ्या सुरुवातीच्या काळात एका झगमगत्या क्षेत्राचे नवीन दालन माझ्यासमोर उघडले गेले, त्याला निमित्त ठरले ते आमचे रुईया कॉलेज! रुईयाचे ‘नाटय़वलय’ म्हणजे एक जादुई यंत्र होते. सहज म्हणून मी मैत्रिणीसोबत ऑडिशनला गेले. संजय नार्वेकर तिथे दिग्दर्शक होते. त्यांनी ‘सातच्या आत घरात’ या एकांकिकेतल्या प्रमुख भूमिकेसाठी माझी निवड केली. माझ्यासोबत निशिकांत कामत होता. त्या वर्षीची सर्व बक्षिसे आमच्या एकांकिकेला मिळाली. मला आणि निशिकांतला अभिनयाची बक्षिसे मिळाली. यातूनच दिग्दर्शक राजन वाघधरे यांनी माझी ‘बोलाची कढी बोलाचा भात’ या मालिकेसाठी निवड केली. त्याच वेळी सहज काढलेले फोटो काही जाहिरात कंपन्यांना मी पाठवले. त्यातून मला जाहिराती मिळाल्या. माझ्या आयुष्यातला तो एक ‘टार्ंनग पॉइंट’ होता. पुढे मी विज्ञान शाखा सोडून कलाशाखेत प्रवेश घेतला. शिक्षण सांभाळून माझ्या करीअरला तिथून सुरुवात झाली.

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात माझ्यातल्या आईपणाची जाणीव करून देणारी घटना माझ्या कायम लक्षात राहिली आहे. माझ्या मुलीचा म्हणजे टीयाचा ‘मिस दादर’चा फायनल इव्हेंट होता आणि त्याच दिवशी माझी खूप महत्त्वाची मीटिंग होती. तिला प्रभादेवीच्या हॉटेल कोहिनूरमध्ये सोडले आणि मी माझ्या कामाला गेले. काही वेळाने ‘आपली टिया ‘मिस दादर’ झाली, टीव्हीवरसुद्धा दाखवत आहेत,’ असा माझ्या नवऱयाचा म्हणजे अंबरचा जेव्हा फोन आला तेव्हा तर माझ्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या होत्या. माझ्या मुलाच्या बाबतीतही असेच झाले. आर्यन डिग्रीनंतर पुढचे शिक्षण बॉडी बिल्डिंगमध्ये घेतले. बॉलीवूडमधल्या अनेक तारे-तारकांना प्रशिक्षण देण्याचे कामही करतो. कधीतरी एखाद्या इव्हेंटमध्ये एखादा तरुण अथवा तरुणी माझ्याकडे येऊन, ‘ओ, यू आर आर्य’ज मॉम!’ असे म्हणते तेव्हा मन सुपाएवढे मोठ्ठे होते. अशा गुणी मुलांचे पालक म्हणून आम्ही खूप समाधानी आहोत. एका आईला याहून अधिक काय हवे असते…!

>> शब्दांकन – राज चिंचणकर