भोंगा…जिद्दीचा यशाचा!

311

>> मिलिंद शिंदे

शिवाजी लोटन पाटील… नदीपलीकडच्या चमचमणाऱया गावाने थेट मुंबईची स्वप्नं दाखवली आणि ही सोनेरी स्वप्नं राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने प्रत्यक्षात उतरली…

‘तीन रुपये प्रति चपाती लाटून देऊन आजही माझी बायको आमच्या संसाराला हातभार लावते’ असं प्रांजळ, दिलदारपणे कबूल करतो. अतिशय पारदर्शक आणि सच्चा, अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील. यात अजिबात खंत नाही आणि असलाच तर तो स्वतःच्या पत्नीचा सार्थ अभिमान आहे.

मु. पो. मांदुर्णे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव. या त्यावेळी पंधराशे लोकसंख्या असलेल्या गावातून या व्यक्तीनं स्वप्नं पाहायला सुरुवात केली. आई-वडील लोकांच्या शेतात सालगडी म्हणून काम करायचे. त्यामुळे उत्पन्न आणि आर्थिक परिस्थिती आपण बेतू शकतो आणि घर लहान असल्यानं, चार भावंडं जोडीला त्यामुळे जागेअभावी मंदिरात झोपावं लागे. यावरून एकूण परिस्थिती, ‘जगणं’ आपण अनुभवू शकतो.

रात्री मंदिरात झोपायचं. भजन-कीर्तन संपलं की एक शांतता पसरे. जवळच एक नदी होती अन् नदीच्या पलीकडे एक गाव. ते नदीपलीकडचं गाव भारी उत्सवी. तिथली जत्रा, मेळे शिवाजीला भुलवत. रात्री पलीकडच्या गावातल्या झगमगाटाची रोषणाई नदीच्या पात्रात तरंगत असायची. त्यावर शिवाजीही डोलत असे. स्वप्नं पाहात असे. पलीकडे कधी जाता येईल? पलीकडचं रंगीबेरंगी जग कधी पाहता येईल? पलीकडची लावणी, तो तमाशा कधी पाहता येईल…? रात्री सोबतीला काका असायचे. त्यांना एक दिवस बुजत विनंती केली आणि काकांनीही पुतण्याचं ऐकलं… दोघांनी रात्रीच्या अंधारात अर्धनग्न अवस्थेत नदी पार केली आणि ढोलकीच्या थापा, मोहित करणारी पायपेटीची सुरावट आणि अस्सल गायकी अनुभवली. तृप्त झाले दोघे.
पण शिवाजीला प्रश्न पडले. मी इथं काय करतोय? मला हे सगळं आवडतं… व्हायचा तो शिक्षणावर परिणाम झाला… शिवाजी बारावीला फेल झाला… नापास.

तरीही या शिक्षणादरम्यान भांबरे सरांनी त्याला दिलेलं प्रोत्साहन शिवाजी मनस्वी कबूल करतो. भांबरे सरांनी मला पहिल्यांदा हेरलं आणि मला माझे कलागुण सादर करता आले आणि तीच कौतुकाची थाप बेचैन करत होती. पण… मांदुर्णे ते मुंबई प्रवास कसा करायचा? प्रश्न होताच…
शिवाजीचे एक काका मुंबईजवळ डोंबिवलीत काम करत होते. शिवाजी त्यांना आर्जवी पत्र पाठवत असे. ‘काका मला मुंबईला यायचंय…’ काका उत्तर देत नसे. इकडं ‘व्हीसीआर’चं युग अवतरलं होतं. पन्नास पैशात सिनेमा डोळय़ात साठवता येत होता. सत्तर एमएमचा पडदा आता गोटीएवढय़ा डोळय़ात जतन करता येत होता… कसंही करून शिवाजी आणि त्याचे काही मित्र पन्नास पैसे जमवायचे आणि सिनेमा व्हिडीओ थिएटरमध्ये जाऊन पाहायचेच.
अजून तगमग वाढली. मुंबई हाक देऊ लागली, पण वाट दिसेना, काकांचंही उत्तर येईना आणि एक दिवस काकाचं उत्तर आलं. ‘ये’. कोण आनंद तो… नाही मुंबई तर किमान डोंबिवलीपर्यंत तरी पोहचता येईल. हुश्श… मांदुर्णे ते डोंबिवली प्रवास झाला. दिशा पुढे सरकू लागली. काकांनी एका रंग कंपनीत शिवाजीला रुजू करून दिलं. पण का कुणास ठाऊक शिवाजीला ते ‘आर्टीफिशियल रंग भावले नाहीत. नोकरी सोडली. काकांनी आणखी एक नोकरी लावली. रुपये 600 महिन्याची. थोडं स्थैर्य आलं. एक राजू नावाचा ड्रायव्हर भेटला. त्याच्याशी जगणं वाटून घेता आलं… आणि एका मित्रासोबत दुधाचं दुकान सुरू केलं… अल्पावधीतच ते चालू लागलं. पैसा हातात खेळू लागला. थोडा वेळही मिळू लागला. त्या वेळात शिवाजी, ‘शिवाजी’ मंदिराच्या कट्टय़ावर जमायला लागला. पण रस्त्याच्या पलीकडे. त्याला तो रस्ता क्रॉस करायला मोठा अवधी लागला. तो लागला कारण त्याची भाषा, एकूण ज्ञान यावरून त्याची खूप हेटाळणी झाली.

दूध डेअरी उत्तम व्यवसाय करत होती. शिवाजी मंदिराच्या फेऱया वाढत होत्या. स्थैर्य येत होतं. भावाला एक ट्रक घेऊन दिला आणि कुठं बिनसलं ? नाही माहीत, पण शिवाजीच्या एकूण आयुष्यावर अवकळा पसरली.
पुन्हा शून्य. पहिल्यापासून सुरुवात. वाताहत झाली ‘अर्थ’ संपले. त्याने डोंबिवली स्टेशनला कांदा-बटाटे विकण्याची गाडी लावली. व्यवसाय सुरू केला. मन साथ देत नव्हतं. एक आशीष कुलकणीं नावाचा मित्र केवळ शिवाजीला मदत म्हणून त्याकडून अतिरिक्त खरेदी करत असे. त्यांनी शिवाजीच्या मनातलं आंदोलन ओळखलं आणि एक संपर्क दिला.

‘25 जून 2000’ ही तारीख शिवाजीला ‘लख्ख’ आठवते. कारण या तारखेनं त्याला भान दिलं की, आपण आणखी किती अभ्यास करायला पाहिजे. कारण त्या पहिल्या दिवशी त्याला ‘नाईफ’ आणि ‘बुके’ या शब्दांचे अर्थ न कळल्यानं गोंधळ उडाला होता. पण त्यानिमित्तानं गौरी कोडीमला ही मैत्रीण भेटली.
शूटिंग कर, एडिटला बस… थोडं भान येऊ लागलं. दिग्दर्शकाला शिवाजी प्रश्न विचारू लागला. दिग्दर्शकाला कळलं. त्यांनी या सीरियलचे पुढचे भाग तूच कर म्हणून विश्वास दिला. मग चॅनलनेही एक सीरियल दिली. छातीत श्वास भरू लागला… पुढे काय…? यातून जे बियाणे निर्माण झाले ते ‘धग’ होतं. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘धग’. उषा जाधव, शिवाजी लोटन पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. काय ते यश. अद्वितीयच. मग राजन खान यांच्या धाडसी कथेवर धाडसी सिनेमा ‘हलाल’ अनेक पुरस्कार मिळाले या सिनेमाला. पुढे काय? प्रश्न शिवाजीला सतत पडतो.
मग आला ‘भोंगा’…
पहिल्या सिनेमाला ‘धग’ला गावानं मदत केली होती. ‘भोंगा’लाही गावानेच मदत केली. भोंगाची प्रक्रिया उन्नत आहे. शिवाजीनं त्याच्या सगळय़ा आधीच्या सहकाऱयांना बोलावलं आणि पैसे कमी आहेत, पण ‘भोंगा’ करायचाय, असं सांगितलं. सगळे तयार झाले आणि वाजला तो ‘भोंगा’ होता. भोंगाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोठा गौरव झाला.
पंधराशे वस्तीचं गाव भोंगा वाजेपर्यंत चार हजार वस्तीचं झालं होतं. पण त्यांच्या काळजातला ‘गर’ सुखावला होता. शिवाजी लोटन पाटील या नावानं भारावला होता.
शिवाजी तू ‘भोंगा’ वाजवलास, पण त्याची ‘आस’ त्या सगळय़ा वाडय़ा, वस्त्या, तांडा, पाडा इथपर्यंत पोहचलीय.
उद्या तुझ्याकडं पाहून नवसृजनाचा बिगुल वाजणार आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या