
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सुरू असलेल्या ‘शिवसंवाद’ यात्रेदरम्यान सभास्थळी झालेली दगडफेक ही निंदनीय घटना आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरदेखील भ्याड हल्ला झाला. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना दिले आहेत.
या दोन्हीही घटनांमुळे राज्यातील आमदारच सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस यंत्रणा अपुरी असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कलमे लावून त्यांना जामीन मिळू नये अशी तरतूद करावी. हे दोन्हीही हल्ले पूर्कनियोजित असल्याचे दिसत असल्याने यामागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास करावा, असे डॉ. गोऱहे यांनी सांगितले.

























































