
एका कंपनीच्या आयपीओवर आक्षेप घेणाऱ्या गुंतवणूकदाराला उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावत चांगलाच झटका दिला आहे.
विनय बन्सल असे या गुंतवणूकदाराचे नाव आहे. व्ही. वर्क कंपनीच्या आयपीओवर बन्सल यांनी आक्षेप घेतला होता. या आयपीओची सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे हा आयपीओ थांबवावा किंवा यात बदल करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी बन्सल यांनी याचिकेत केली होती. न्या. रियाज छागला आणि न्या. फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आयपीओ जाहीर झाल्यानंतर त्यात बदल करता येईल का, असा सवाल करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि बन्सल यांना एक लाखांचा दंड ठोठावला.
काय आहे प्रकरण
या कंपनीचा आयपीओ सेबीने तीन महिने रोखून ठेवला होता. याबाबत तक्रार असतानाही नंतर सेबीने या आयपीओला परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे व्ही. वर्क हा ब्रँड या कंपनीचा नाही. या ब्रँडचा परवाना फक्त कंपनीकडे आहे. याची संपूर्ण माहिती गुंतवणूकदारांना द्यायला हवी. तसेच कंपनीचा अन्य आर्थिक तपशील दिला गेला नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
























































