
सामना ऑनलाईन । चंदिगढ
किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या साखळी लढतीत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर 6 गडी व 12 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा शेवट गोड केला. मात्र, पंजाबचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाल्याने हा विजय त्यांच्यासाठी केवळ दिलासा देणारा ठरला. 71 धावांची आक्रमक खेळी करणारा लोकेश राहुल सामन्याचा मानकरी ठरला.
लोकेश राहुलची वादळी खेळी
चेन्नईकडून मिळालेले 171 धावांचे लक्ष्य पंजाबने 18 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 173 धावा करून पूर्ण केले. लोकेश राहुल (71) व ख्रिस गेल (28) यांनी 10.3 षटकांत 108 धावांची सलामी दिली. लोकेशने 36 चेंडूत 7 सणसणीत चौकार व 5 उतुंग षटकारासह आपली वादळी खेळी सजविली. हरभजन सिंगने त्याला इम्रान ताहिरकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. ख्रिस गेलने 28 चेंडूत 2 चौकार व तितक्याच षटकारासह 28 धावांची खेळी केली.
निकोलस पुरनची फटकेबाजी
हरभजन सिंगने सलामीची जोडी एकाच षटकात बाद केल्यानंतर आलेल्या निकोलस पुरनने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. मयांक अग्रवालला (7) हरभजन सिंगने जाडेजाकरवी झेलबाद केले. त्यानंतर विजयासाठी 7 धावांची गरच असताना निकोलस बाद झाला. 22 चेंडूंत 3 षटकार व 2 चौकारांसह 36 धावांची फटकेबाजी करणाऱ्या निकोलसला रवींद्र जाडेजाने यष्टीमागे धोनीकरवी झेलबाद केले. मग मनदीप सिंग (नाबाद 11) व सॅम कुरन (नाबाद 6) यांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून हरभजन सिंगने 3, तर रवींद्र जाडेजाने एक बळी टिपला.
डू प्लेसिसचे शतक हुकले, रैनाचे अर्धशतक
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 5 बाद 170 धावसंख्या उभारली. सलामीवीर फाफ डू प्लेसिसने 96 धावांची जबदस्त फेरी केली. त्याने 55 चेंडूत 10 सणसणीत चौकारांसह 4 टोलेजंग षटकार ठोकले. सॅम कुरनने त्रिफळा उडविल्याने डू प्लेसिसचे अवघ्या चार धावांनी शतक हुकले. सॅम कुरने शेन वॉटसनचा (7) पाचव्या षटकात त्रिफळा उडवून किंग्ज इलेव्हन पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्याच्या जागेवर आलेल्या सुरेश रैनाने डू प्लेसिसला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी करीत चेन्नईला दीडशेपर्यंत पोहोचविले. रैनाने 38 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. कुरनने रैनाला शमीकरवी झेलबाद करून चेन्नईला दुसरा धक्का दिला. 19व्या षटकात डू प्लेसिस बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद 10 धावा करीत चेन्नईला 170 धावसंख्येपर्यंत पोहोचविले.


























































