IPL 2020 – ‘आयपीएल’च्या आयोजनाने यूएई क्रिकेट बोर्ड मालामाल, ‘बीसीसीआय’कडून मिळाले शंभर कोटी रुपये

कोरोनाच्या संकटामुळे ‘बीसीसीआय’ला ‘आयपीएल’च्या 13व्या सत्राचे यूएईमध्ये आयोजन करावे लागले. ही स्पर्धा झाली नसती तर ‘बीसीसीआय’ला 400 कोटी रुपयांचा फटका बसला असता. अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ‘बीसीसीआय’ला मदत केली. त्याचा मोठा आर्थिक फायदा यूएई क्रिकेट बोर्डाला झाला असून ‘बीसीसीआय’कडून त्यांना तब्बल शंभर कोटी रुपये मिळाले.

29 मार्चपासून सुरू होणारी ‘आयपीएल’ कोरोनाच्या संकटामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत गेल्याने ‘आयपीएल’च्या आयोजनाबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती, मात्र कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ‘बीसीसीआय’ला आयपीएलच्या आयोजनासाठी विंडो तयार झाली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मायदेशात या स्पर्धेचे आयोजन करणे शक्य नसल्याने ‘बीसीसीआय’ने यूएई आणि श्रीलंका या दोन देशांत चाचपणी करून यूएईला पसंती दिली. यूएई सरकार आणि तेथील क्रिकेट मंडळाने आयपीएलच्या यशस्वी आयोजनासाठी ‘बीसीसीआय’ला मदत केली.

40 कोटी रुपये अधिक मोजले

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजाह, दुबई आणि अबुधाबी या 3 मैदानावर आयपीएलचा 13 वा हंगाम पार पडला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने यूएई क्रिकेट बोर्डाला 14 लाख डॉलर्स (अंदाजे 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम) दिले आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’च्या यजमानपदामुळे यूएईमधील क्रिकेट बोर्ड चांगलेच मालामाल झाले. हीच स्पर्धा हिंदुस्थानात झाली असती तर बीसीसीआयला 60 कोटी रुपये खर्च आला असता. कारण ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार ‘आयपीएल’च्या एका सामन्यासाठी एक कोटी रुपये संबंधित संलग्न राज्य संघटनेला द्यावे लागतात. त्यामुळे 60 सामन्यांचे 60 कोटी रुपये झाले असते. ‘बीसीसीआय’ला यूएईमध्ये ही रक्कम 30 ते 50 लाखांपर्यंत वाढवावी लागली. त्यामुळे यंदा ‘बीसीसीआय’ला 40 कोटी रुपये अधिक मोजावे लागले.

14 हॉटेल्सलाही मिळाला व्यावसाय

आयपीएलच्या निमित्ताने यूएईमधील तब्बल 14 फाईव्ह स्टार हॉटेल्सला मोठा व्यावसाय मिळाला. स्पर्धेतील आठ संघांचा लवाजमा, पंच, समालोचक, बीसीसीआयचे पदाधिकारी आणि प्रेक्षपण हक्क मिळालेल्या चॅनलचे कर्मचारी असे कितीतरी जण तब्बल अडीच महिने यूएईमध्ये होते. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा गल्ला जमला.

आपली प्रतिक्रिया द्या