IPL 2020 – चेन्नईचा पाय आणखी खोलात, ‘स्टार’ खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

पराभवाचा छायेत अडकलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पाय आणखी खोलात गेला आहे. चेन्नईचा ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’ गोलंदाज ड्वेन ब्रावोला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो काही दिवसांसाठी, किंवा काही आठवड्यांसाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत खेळताना दिसणार नाही, असे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.

प्लेमिंग यांनी ब्राव्हो आयपीएलमधून जवळपास बाहेर फेकला गेल्याचे संकेत दिले आहे. यामुळे चेन्नईला तगडा धक्का बसला आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या लढतीत ब्राव्होला दुखापत झाली होती. यामुळे तो अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानात उतरू शकला नाही. अंतिम षटक जडेजाने टाकले आणि तो 17 धावांचा बचाव करू शकला नाही. त्यामुळे चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला.

ब्राव्होच्या दुखापतीबाबत बोलताना प्लेमिंग म्हणाले की, सध्या त्याची दुखापत किती गंभीर आहे हे तपासले जात आहे. सध्या तो काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी खेळू शकणार नाही, असे मानूनच पुढे जावे लागेल, असेही ते म्हणाले. तसेच दिल्ली विरुद्धच्या लढतीबाबत बोलताना ते म्हणाले की, शिखर धवनला अनेकदा जीवदान दिल्याचा तोटा चेन्नईच्या संघाला सहन करावा लागला.

दरम्यान, चेन्नईने यंदा 9 लढतीत 6 पराभव पाहिले आणि 3 विजय मिळवले आहेत. आणखी 1 किंवा 2 लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यास चेन्नई प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर होण्याचा धोका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या