IPL 2020 – अखेर चेन्नईला विजय गवसला, बंगळुरूला 8 विकेट्सने मात; गायकवाडचे नाबाद अर्धशतक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत सलगच्या पराभवामुळे टीकेचे धनी झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला विजय गवसला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकत नाबाद 65 धावांची खेळी केली.

बंगळुरूने विजयासाठी दिलेले 146 धावांचे आव्हान चेन्नईने 18.2 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड याने 51 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या, तर धोनी 19 धावांवर नाबाद राहिला. डु प्लेसिसने 25 आणि अंबाती रायडू याने 39 धावांची उपयुक्त खेळी केली.

कोहलीची झुंज

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूला फिंच आणि पडीकलने 31 धावांची सलामी दिली. फिंच 15 आणि पडीकल 22 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या विराटने एकबाजू लावून धरत अर्धशतक ठोकले.

डिव्हीलिअर्सने 39 धावा फटकावल्या, मात्र बंगळुरूच्या फलंदाजाला वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. तसेच विराट-डिव्हीलिअर्स व्यतिरिक्त इतर खेळाडू मोठी खेळी करण्यात अयशस्वी राहिले.

टिच्चून गोलंदाजी

चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. सॅम कुरम याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर दीपक चहरने 2 आणि यंदा पहिलाच सामना खेळणाऱ्या संटनर याने 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या