IPL 2021 – रोहित शर्माची सेना तिसऱया विजयासाठी रेडी, पंजाबला टाळायचाय पराभवाचा चौकार

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मागील दोन स्पर्धा जिंकण्याची करामतही या संघाने करून दाखवलीय. पण हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने चारपैकी दोन लढतींमध्ये विजय मिळवला खरा, पण दोन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामनाही करावा लागलाय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चारही लढतींमध्ये मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागलाय. मुंबई इंडियन्सचा संघ उद्या पंजाब किंग्जला भिडणार आहे. यावेळी मधल्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्मची चिंता मुंबई इंडियन्सला असणार आहे. याप्रसंगी सलग तीन पराभवाला सामोरा गेलेला पंजाब किंग्जचा संघ याचा फायदा घेत मोसमातील दुसऱया विजयाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला असेल. मुंबई इंडियन्स तिसरा विजय मिळवतो की पंजाब किंग्ज सलग चौथा पराभव टाळतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सूर्य, इशान, हार्दिक, कृणाल, पोलार्डला कामगिरी उंचावावी लागेल

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली आहे. अर्थात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. पण पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने छान फलंदाजी केलीय. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबई इंडियन्सला घवघवीत यश संपादन करता आलेले नाही. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी मागील मोसमात सामना जिंकून देणाऱया खेळी केल्या आहेत. यंदा मात्र दोघांनाही ते जमलेले नाही. हार्दिक पांडय़ा व कृणाल पांडय़ा या बंधूंकडूनही निराशा झाली आहे. कायरॉन पोलार्डने एक डावात छान फलंदाजी केलीय, पण त्याच्या कामगिरीतही सातत्य नाहीए. त्यामुळे या सर्व फलंदाजांना आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे.

फलंदाज ठरलेत अपयशी

पंजाब किंग्जला यंदाच्या मोसमात चारपैकी एकाच लढतीत विजय मिळवता आलाय. कर्णधार लोकेश राहुलने मागील मोसमातील फॉर्म याही स्पर्धेत कायम ठेवलाय. पण इतर फलंदाजांकडून अपयशाचा सामना करावा लागत आहे. मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरण, दीपक हुडा यांना निराशेच्या गर्तेमधून बाहेर यावे लागणार आहे. मयांक अग्रवाल व दीपक हुडा यांना कामगिरीत सातत्य दाखवायला लागणार आहे. शाहरुख खानला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय पंजाब किंग्जने घेतल्यास याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

शमीला झालेय तरी काय…

पंजाब किंग्जच्या गोलंदाजीची मदार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आहे. पण दुखापतीमधून बाहेर येत पुनरागमन करणाऱया मोहम्मद शमीला अद्याप आयपीएलमध्ये ठसा उमटवता आलेला नाही. याचा फटका या संघाला बसत आहे. अर्शदीप सिंग हा युवा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. मुरुगन अश्विन, दीपक हुडा, फॅबियन अॅलेन यांनाही प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना रोखावे लागणार आहे. रवी बिष्णोई या युवा फिरकी गोलंदाजाला उद्याच्या लढतीत अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात येऊ शकते. चेन्नईतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक अशी असल्यामुळे उद्याही येथे फिरकी गोलंदाजांचाच बोलबाला दिसून येईल.

गोलंदाजी विभागाची चोख कामगिरी

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चोख कामगिरी बजावली आहे. कमी धावसंख्येतही संघाला विजय मिळवून दिलेत. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. कृणाल पांडय़ाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. तसेच पाचव्या गोलंदाजांची कमतरता संघाला नक्कीच जाणवतेय.

आजची आयपीएल लढत

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज चेन्नई, रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या