जायबंदी स्टोक्स आयपीएलमधून बाहेर, राजस्थान रॉयल्सला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या 14 व्या मोसमात सलामीलाच पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या राजस्थान रॉयल्सला आणखी एक तगडा धक्का बसला आहे. त्यांचा भरवशाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स जायबंदी झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये बेन स्टोक्सला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असून त्यामुळे बेन स्टोक्सला उर्वरित आयपीएलमध्ये खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बेन स्टोक्स संघासोबतच राहून इतर सहकाऱयांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार असल्याचे राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बेन स्टोक्स जायबंदी झाल्याची माहिती राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना बेन स्टोक्सच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. क्रिकेट इंग्लंडकडूनही यासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन असून माहिती देण्यात आली आहे. सूर मारून ख्रिस गेलचा झेल टिपताना बेन स्टोक्सला ही दुखापत झाली होती. बेन स्टोक्ससारखा खेळाडू उर्वरित आयपीएलला मुकणार असल्याने राजस्थान रॉयल्स संघाची घडी विस्कटली आहे. कारण बेन स्टोक्सच्या तोडीचा दुसरा अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे नाहीये. बेन स्टोक्स हा क्रिकेट विश्वातील नंबर वन अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्यामुळे राजस्थानला या धक्क्यातून सावरण्यास किती वेळ लागेल हे बघावे लागेल.