हैदराबादच्या विजयाचा ‘अभिषेक’; पंजाबची आयपीएलमध्ये पराभवाने सांगता

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत खरं तर शनिवारीच प्ले ऑफमधील चार संघांचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे कधीच आव्हान संपुष्टात आलेल्या पंजाब किंग्जची रविवारी पराभवाने आयपीएलमधून सांगता झाली. सनरायझर्स हैदराबादने त्यांना 4 गडी व 5 चेंडू राखून पराभूत करत गुणतक्त्यात दुसऱया स्थानी झेप घेतली. मात्र रात्रीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला हरविल्यास हैदराबादची पुन्हा तिसऱया स्थानी घसरण होणार आहे. अभिषेक शर्माच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादच्या विजयाचा आज अभिषेक झाला.

पंजाबकडून मिळालेले 215 धावांचे लक्ष्य हैदराबादने 19.1 षटकांत 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर त्रिफळाबाद होऊन ट्रव्हिस हेड गोल्डनडक झाला, मात्र दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मावर याचा कुठलाच परिणाम झाला नाही. त्याने राहुल त्रिपाठीच्या साथीत दुसऱया विकेटसाठी 30 चेंडूंत 72 धावांची भागीदारी करीत हैदराबादच्या विजयाची पायाभरणी केली. हर्षल पटेलने त्रिपाठीला अर्शदीपकरवी झेलबाद करून पंजाबला दुसरे यश मिळवून दिले. त्रिपाठीने 18 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 33 धावांची खेळी केली. त्यानंतर अभिषेक शर्माने आलेल्या नितीश कुमार रेड्डीच्या (37) साथीत 31 चेंडूंत 57 धावांची भागीदारी केल्याने हैदराबादने दहा षटकांतच सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडला होता. अभिषेक शर्माने 28 चेंडूंत 66 धावांची वादळी खेळी करताना 6 षटकारांसह 5 चौकारांचा घणाघात केला. शशांक सिंगने अभिषेकला शिवम सिंगकरवी झेलबाद करून हे वादळ शांत केले. त्यानंतर हेन्री क्लासेन (42), अब्दुल समद (नाबाद 11) व सन्वीर सिंग (नाबाद 6) यांनी हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबकडून अर्शदीप सिंग व हर्षल पटेल यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर हरप्रीत बरार व शशांक सिंग यांना 1-1 बळी मिळाला.

त्याआधी, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 5 बाद 214 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अथर्व तायडे (46) व प्रभसिमरन सिंग (71) यांनी 9.1 षटकांत 97 धावांची खणखणीत सलामी दिली. तायडेने 27 चेंडूंत 5 चौकारांसह 2 षटकार ठोकले, तर प्रभसिमरनने 45 चेंडूंत 4 षटकारांसह 7 चौकारांचा घणाघात केला. टी. नटराजनने दहाव्या षटकांत तायडेला सनवीर सिंगकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर प्रभसिमरनने आलेल्या रिली रौसौवच्या (49) साथीत दुसऱया विकेटसाठी 32 चेंडूंत 54 धावांची भागीदारी करीत पंजाबला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. विजयकांत व्यासकांतने प्रभसिमरनला यष्टीमागे क्लासेनकरवी झेलबाद करून हैदराबादला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार पॅट कमिन्सने रिलीला अब्दुल समदकरवी झेलबाद करून त्याला अर्धशतकापासून वंचित ठेवले. रिलीने 24 चेंडूंत 49 धावां करताना 4 टोलेजंग षटकारांसह 3 चेंडू सीमापार पाठविले. त्यानंतर सॅम करणच्या गैरहजेरीत पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱया जितेन शर्माने 15 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह नाबाद 32 धावांची खेळी करीत पंजाबला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादकडून टी. नटराजनने 2 फलंदाज बाद केले, तर पॅट कमिन्स व विजयकांत यांना 1-1 बळी मिळाला.