
IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतले आहेत. आरसीबीने गुरुवारी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) वर 24 धावांनी विजय मिळवला. आरसीबीने पंजाब समोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पीबीकेएसचा संघ 18.2 षटकांत 150 धावांवरच आटोपला. बंगळुरूकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने किलर गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देत 4 बळी घेतले. आरसीबीचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. तर पंजाबला यंदा तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. शिखर धवन अनफिट असल्यामुळे पंजाबचे नेतृत्व सॅम करनकडे होते. त्याचवेळी विराट कोहलीने आरसीबीची कमान हाती घेतली होती.
आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे (0) पहिल्याच षटकात एलबीडब्ल्यू झाला. तर मॅथ्यू शॉर्ट (8), लियाम लिव्हिंगस्टोन (2) आणि हरप्रीत सिंग भाटिया (13) यांना खास खेळी करता आली नाही. मात्र, प्रभसिमरन सिंग (46) याने आरसीबीच्या गोलंदाजीचा चांगला सामना केला. त्याने करन (10) सोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. 10व्या षटकात करन आणि 12व्या षटकात प्रभासिमरन पॅव्हेलियनमध्ये परतले. जितेश शर्मा (41) याने हरप्रीत ब्रार (13) सोबत आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. शाहरुख खानने 7 आणि नॅथन एलिसने एक धावांचे योगदान दिले. शेवटचा खेळाडू जितेश हा हर्षल पटेलचा बळी ठरला. वनिंदू हसरंगने दोन आणि वेन पारनेलने एक गडी बाद केला. तर पंजाबचे दोन खेळाडू धावबाद झाले.

























































