IPL 2024 : गुजरात दिल्लीतही पराभूत; शेवटच्या चेंडूवर दिल्ली जिंकली

शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना राशीद खानने सलग दोन चौकार आणि एक षटकार ठोकून गुजरातला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले होते. मात्र अखेरच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना तो मुकेश कुमारच्या अचूक चेंडूवर षटकार खेचण्यात अपयशी ठरला आणि दिल्लीने गुजरातला अहमदाबादपाठोपाठ दिल्लीतही नमवले. दिल्लीने 4 धावांनी हा थरार जिंकत गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली.

ऋषभ पंत आणि अक्षर पटेलच्या खेळींच्या जोरावर दिल्लीने गुजरातसमोर 225 धावांचे आव्हान ठेवले, पण षटकार-चौकारांच्या हवाई हल्ल्यांनी आता तेसुद्धा कमी वाटू लागले आहे. वृद्धिमान साहा (39) आणि साई सुदर्शन (65) यांच्या खेळींमुळे गुजरातने दिल्लीचा जबरदस्त पाठलाग केला होता. मग डेव्हिड मिलरने 23 चेंडूंत 55 धावा ठोकत गुजरातचे आव्हान कायम राखले होते. मग तळाला साई किशोरने सलग दोन षटकार खेचत गुजरातच्या आशा उंचावल्या. राशीदनेही आपल्या बॅटची कमाल दाखवत दिल्लीच्या हृदयाचे ठोके वाढवले. 2 चेंडूंत 11 धावांची गरज असताना त्याने मारलेला षटकार विजयाची ग्वाही देत होता, पण तो शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकण्यात अपयशी ठरला आणि गुजरातला हार सहन करावी लागली.

त्याआधी 15 षटकांत 4 बाद 127 अशी सामान्य धावसंख्या असलेल्या दिल्लीला ऋषभ पंतच्या 88 धावांच्या खेळीने स्फुरण चढले. पंतने ट्रिस्टन स्टब्सच्या साथीने शेवटच्या 5 षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी करत गुजरातच्या गोलंदाजीला फोडून काढत 97 धावा वसूल केल्या आणि दिल्लीला 4 बाद 224 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.

गुजरातने नाणेफेक जिंकताच दिल्लीला फलंदाजी दिली आणि दिल्लीचे पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर आणि शाय होप पन्नाशीतच माघारी परतले. मात्र अक्षर पटेलने ऋषभ पंतच्या साथीने 113 धावांची भागी रचत दिल्लीला मजबूत स्थितीत आणले. अक्षरने 66 धावा काढल्या. मग शेवटच्या 5 षटकांत दिल्लीने 11 षटकार आणि 4 चौकारांची बरसात करत 97 धावा फोडून काढल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहित शर्माच्या शेवटच्या षटकांत ऋषभने 6, 4, 6, 6, 6 असे फटके मारत त्याच्या गोलंदाजीचे पृथ्थकरणच बदलून टाकले. 20 व्या षटकात दिल्लीने 31 धावा काढल्यामुळे मोहितने 4 षटकांत 73 धावा मोजल्या आणि तो आयपीएलमधला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणाऱया पंतने 43 चेंडूंत नाबाद 88 धावा ठोकल्या. स्टब्सने 7 चेंडूंत 27 धावा चोपून काढल्या.