लखनऊचा नवाबी विजय; चेन्नईचा 8 विकेटच्या पराभवाने केला पाहुणचार

आज पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्सच्या चेहऱयावर स्मितहास्य उमलले. कर्णधार लोकेश राहुलच्या तडाखेबंद 82 धावा आणि त्याने क्विंटन डिकॉकसह केलेल्या 134 धावांच्या जबरदस्त सलामीच्या जोरावर लखनऊने नवाबी थाटात चेन्नईचा 8 विकेट आणि सहा चेंडू राखून सहज पराभव केला. लखनऊचा हा चौथा विजय असून त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर तिसरा विजय नोंदवला.

आज लखनऊसाठी पुन्हा एकदा मुस्कुराईए, आप लखनऊ मैं है हे त्यांचे वाक्य आनंददायी ठरले. रवींद्र जाडेजाच्या मेहनतीमुळे चेन्नईने लखनऊसमोर 177 धावांचे आव्हान उभारले गेले, पण डिकॉक आणि राहुल या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा पहिल्या षटकापासून पाहुणचार घेतला आणि सामना एकतर्फी केला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके साकारत 134 धावांची सलामी दिली. डिकॉक 54 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुलने संघाला विजयाच्या ट्रकवरून हलू दिले नाही. 82 धावांवर  त्याचा अप्रतिम झेल जाडेजाने टिपत त्याची 9 चौकार आणि 3 षटकारांची खेळी संपवली. मग पूरन आणि स्टॉयनिसने 19 व्या षटकांत संघाचा विजय साकारला. राहुलची कर्णधाराला साजेशी खेळीच सामनावीर ठरली.

त्याआधी लखनऊच्या मैदानात चेन्नईच्या एकाही स्टारला सूर गवसला नाही. ना रचिन रवींद्र खेळला, ना कर्णधार ऋतुराजच्या बॅटीतून धावा आल्या, ना शिवम दुबेचा झंझावात दिसला. 33 धावांत दोन दिग्गज फलंदाज बाद झाल्यावर बढती मिळालेल्या जाडेजाने सलामीवीर अजिंक्य रहाणेसह 35 धावांची भागी रचत संघाला अर्धशतकी टप्पा गाठून दिला. कृणाल पंडय़ाने अजिंक्य आणि शिवम दुबेला बाद करत चेन्नईची 4 बाद 87 अशी अवस्था केली. मग समीर रिझवीसुद्धा बाद झाला. नव्वदीतच चेन्नईचा अर्धा संघ बाद झाला होता आणि 13 षटकांचा खेळही झाला होता. तेव्हा मोईन अली आणि जाडेजाने 51 धावांची भागी रचली. मोईनने 20 चेंडूंत 30 धावा काढताना 3 षटकार ठोकले.

मोईन बाद झाला तेव्हा 18 षटकांत 142 धावा झाल्या होत्या. पुढील 12 पैकी 9 चेंडू धोनीच खेळला आणि त्याने 2 षटकार आणि 3 चौकार ठोकत चेन्नईची धावसंख्या 176 पर्यंत नेली. जाडेजाने 57 धावांची अभेद्य खेळी करत आपले यंदाचे पहिले अर्धशतक साकारले. लखनऊकडून पंडय़ाने 16 धावांत 2 विकेट टिपले तर उर्वरित सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक यश मिळवता आले.