दिल्लीला हादरवण्यासाठी हैदराबाद सज्ज

सध्याच्या घडीला आयपीएल रंगतदार स्थितीमध्ये पोहचले असून, चौकार आणि षटकारांची बरसात होत आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी खऱया अर्थाने रंग भरलेत. ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम,हेन्रीक क्लासन यांनी तुफानी फलंदाजी करून गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला आहे. दिल्ली पॅपिटल्सविरुद्ध होणाऱया सामन्यातही हैदराबादचा नवा हादरा देण्याच्या तयारीत आहेत. सामना दिल्लीत असला तरी हैदराबाद दिल्लीत चौकार-षटकारांचे किती स्पह्ट घडवतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात होणारी लढत आयपीएलमधील 35 वी लढत आहे. सध्या गुणतालिकेत हैदराबाद 8 गुणांसह चौथ्या स्थानावर, तर दिल्ली 6 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. उद्याचा सामना हा दिल्लीच्या घरच्या मैदानावर असून दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दिल्ली आणि हैदराबाद यांच्या आतापर्यंत एकूण 23 लढती झाल्या असून दिल्लीने 11, तर हैदराबादने 12 वेळा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे उद्याचा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर असली तरी हैदराबादचे पारडे जड राहू शकते, असा अंदाज क्रिकेटतज्ञांनी व्यक्त केला आहे.

सध्याच्या घडीला हैदराबादचे फलंदाज तुफान फॉर्मात आहेत. गेल्या सामन्यात ट्रव्हिस हेडने तुफानी शतकी खेळी केल्यामुळे त्यांचे मनोधैर्य अधिक उंचावलेले आहे. हेडला अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेन्रीक क्लासन यांची उत्तम साथ लाभत आहे. तर, दुसरीकडे काही सामन्यांमध्ये दिल्लीची गोलंदाजी ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. खलील एहमद, कुलदीप यादव हे दोघे वगळता इतरांना फारसा प्रभावी मारा करता आलेला नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात हैदाराबादच्या तुफानी फॉर्मात असलेल्या फलंदाजांपुढे दिल्लीच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे.

गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असलेला दिल्लीचा स्पह्टक फलंदाज डेव्हिड वॉर्नर उद्याच्या सामन्यात खेळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीचे जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, पृथ्वी शॉ हे कितपत तग धरू शकतात त्यावर दिल्लीचा विजय अवलंबून असणार आहे.