
घरच्या मैदानातील निराशाजनक कामगिरी विसरून अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयी पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. सोमवारी त्यांचा संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.
अलीकडेच झालेल्या सामन्यात दिल्लीचा संघ कोलकाता नाइट रायडर्सशी 14 धावांनी पराभूत झाला होता. मात्र ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेशाच्या त्यांच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱया हैदराबादच्या संघाला पराभूत करण्यासाठी ते मैदानात उतरणार आहेत.
अष्टपैलू अक्षर पटेल कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे का? ते लवकरच कळेल.
क्षेत्ररक्षणादरम्यान अक्षर दुखापतग्रस्त झाला असला तरी त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने 23 चेंडूंत 43 धावा फटकवल्या. जर का पूर्णपणे तंदुरुस्त न होताच खेळायला आला तर गोलंदाजीतील त्याच्या विविधतेमध्ये मर्यादा येऊ शकतात.
शनिवारच्या सामन्यापर्यंत दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी होता. 10 सामन्यांत त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत. मात्र घरच्या मैदानातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. हा पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न संघाचा असेल.

























































