IPL 2026 Auction – कॅमरून ग्रीन कोलकाताच्या ताफ्यात; 25.20 कोटींची बोली, पण मिळणार फक्त 18 कोटी

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव अबुधाबीत रंगला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर सर्वाधिक बोली लागली. त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात रस्सीखेच पाहायला मिळाली. कोलकाताने 25.20 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत ग्रीनला आपल्याकडे खेचले. आयपीएलच्या इतिहासामध्ये कोणत्याही विदेशी खेळाडूसाठी लागलेली ही सर्वाधिक बोली आहे.

आयपीएलच्या लिलावामध्ये याआधी सर्वाधिक 27 कोटींची बोली हिंदुस्थानचा यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत याच्यासाठी लागली होती. त्याला लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले होते. तर पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी मोजले होते. त्यानंतर आता ग्रीन हा आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. अर्थात त्याच्यासाठी 25.20 कोटींची बोली लागली असली तरी बीसीसीआयच्या एका नियमामुळे त्याला फक्त 18 कोटी रुपयेच मिळणार आहेत.

काय आहे नियम?

मिनी लिलावामध्ये विदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागेल असा अंदाज होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा एक नवीन नियम आणला. विदेशी खेळाडूवर जास्तीत जास्त 18 कोटी रुपयांचीच बोली लागेल आणि त्यावर बोली गेली तरी त्यांना 18 कोटी रुपयेच मिळतील. उर्वरित रक्कम ही प्लेअर्स वेल्फेयर फंडमध्ये टाकणार आहे. हा फंड देशांर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या प्रगतीसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे ग्रीनसाठी 25.20 कोटींची बोली लागली असली तरी त्याला प्रत्यक्षात 18 कोटी मिळतील. उर्वरित 7.20 कोटी रुपये बीसीसीआयच्या प्लेअर्स वेल्फेयर फंडमध्ये जातील.