दिल्लीला रोखण्यासाठी गुजरातची धडपड; एकाला विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी, तर दुसऱ्यावर पराभवाच्या हॅट्ट्रिकची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये आपले वर्चस्व अधिक बळकट करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीकडून अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात त्यांचा सामना सध्या डळमळीत कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात दिल्ली आपले विजयी सातत्य कायम राखण्यासाठी उतरणार आहे, तर गुजरात आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी धडपडणार आहे. त्यामुळे या सामन्यात हॅट्ट्रिक कोण करतो याकडे लक्ष लागले आहे.

दिल्लीने आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर सलग दोन सामने जिंकले असले तरी फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवतोय. 22 वर्षीय समीर रिझवीने आपल्या दोन्ही खणखणीत खेळीत संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ साधत संघाला आधार दिला आहे. सलग तिसऱ्या अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असलेला रिझवी सध्या दिल्लीचा प्रमुख आधारस्तंभ ठरत आहे.

केएल राहुल अजून अपेक्षित लयीत दिसत नसला तरी, मोठी खेळी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. तिसऱ्या क्रमांकावर नीतीश राणा मात्र दबावाखाली खेळताना दिसत असून, ही बाब संघासाठी चिंतेची ठरते. श्रीलंकेचा पथुम निसांका मागील सामन्यात लयीत दिसला होता आणि पॉवरप्लेमध्ये तो रबाडा व सिराजसारख्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे सामोरा जाऊ शकतो. गोलंदाजीत मुकेश पुमारचे अचूक माऱ्यासह अक्षर पटेलचे सर्वांगीण योगदान दिल्लीची मोठी ताकद आहे. त्यात लुंगी एनगिडी, टी. नटराजन आणि पुलदीप यादव यांच्या कामगिरीमुळे दिल्लीची गोलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सची अवस्था सध्या चिंताजनक आहे. सलग दोन पराभवांनंतर संघावर दबाव वाढला आहे. साई सुदर्शनने चांगली सुरुवात करूनही मधल्या फळीतील ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.

कर्णधार शुभमन गिल दुखापतीतून सावरत असून, त्याची पुनरागमनाची शक्यता आहे. गोलंदाजीत सिराज आणि रबाडा महागडे ठरत आहेत, आणि दुसरीकडे प्रसिध पृष्णही सातत्य राखण्यात अपयशी ठरलाय. मात्र, राशिद खानने आपली लय मिळवली असून, युवा गोलंदाज अशोक शर्माच्या प्रभावी फिरकीने संघाच्या आशा वाढल्या आहेत. कोटलाची खेळपट्टी पारंपरिकपणे फलंदाजांना अनुपूल असली तरी, अलीकडील सामन्यात ती संथ ठरतेय. त्यामुळे या लढतीत फलंदाज की गोलंदाज… कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.