
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफ गाठण्याचा पहिला मान मिळविला. त्यांनी पंजाब किंग्जला 23 धावांनी धूळ चारत 18 गुणांची कमाई करीत ही कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्जने सलग सहा सामने गमविल्याने आता हा संघ 13 गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत डेंजर झोनमध्ये आला आहे. आता त्यांच्यावर अखेरचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकून जर-तरच्या समीकरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. सुपरस्टार खेळाडू विराट कोहलीचे विक्रम, ‘सामनावीर’ ठरलेल्या वेंकटेश अय्यरचे वादळी अर्धशतक आणि त्यानंतरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने बंगळुरूने रविवारचा सामना गाजवला.
पंजाबची आघाडीची फळी फ्लॉप
बंगळुरूकडून मिळालेल्या 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 8 बाद 199 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग ही पंजाबची स्टार सलामीची जोडी पुन्हा फ्लॉप ठरली. अनुभवी भुवनेश्वर कुमारने तिसऱ्याच चेंडूवर प्रियांशचे दांडके उडविले. त्याला भोपळाही फोडता आला नाही, तर पुढच्याच षटकात त्याने प्रभसिमरनलाही पडिक्कलकरवी झेलबाद करून अवघ्या 18 धावांत पंजाबची सलामीची जोडी तंबूत धाडली. त्यानंतर रसिक सलामने कर्णधार श्रेयस अय्यरला अवघ्या एका धावेवर यष्टीमागे कर्णधार जितेश शर्माकरवी झेलबाद करून पंजाबची 3 बाद 19 अशी दुर्दशा केली.
मधल्या फळीचा अपयशी प्रतिकार
पंजाबचा डाव संकटात सापडलेला असताना कॉनोली (37), सूर्यांश शेडगे (35) व मार्कस स्टॉयनिस (37) या मधल्या फळीने बंगळुरूच्या गोलंदाजीचा काही प्रमाणात प्रतिकार केला, मात्र कॉनोलीला रोमारिओ शेफर्डने बेथेलकरवी झेलबाद केले. मग सुयश शर्माने कोहलीकरवी झेलबाद करून शेडगेचा अडसर दूर केला, तर जोश हेझलवूडने स्टॉयनिसला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर शशांक सिंगने 27 चेंडूंत 4 षटकार व 4 चौकारांसह 56 धावांची वेगवान खेळी केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. बंगळुरूकडून रसिक सलामने 3, तर भुवनेश्वरने 2 फलंदाज बाद केले.
वेंकटेश अय्यरची फटकेबाजी
मधल्या षटकांत वेंकटेश अय्यरने आक्रमणाची धुरा सांभाळली. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 40 चेंडूंत नाबाद 73 धावा ठोकल्या. लॉकी फर्ग्युसनसह सर्व गोलंदाजांवर त्याने मोठे फटके लगावत आरसीबीचा धावफलक सतत वेगाने हलता ठेवला. शेवटच्या फटकेबाजीच्या दोन षटकांत टीम डेव्हिडनेही 12 चेंडूंत 2 षटकार व 2 चौकारांसह 28 धावा चोपत संघाला 222 धावांपर्यंत नेले. हरप्रीत ब्रारच्या अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. अय्यरने 8 चौकार व 4 षटकारांसह आपली नाबाद 73 धावांची खेळी सजवली.
कोहलीची अर्धशतकी खेळी
त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 बाद 222 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र या संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. जेकब बेथेल (11) लवकर बाद झाला. हरप्रीत बरारने तिसऱ्याच षटकात त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर विराट कोहली (58) आणि देवदत्त पडिक्कल (45) यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांवर सतत दबाव निर्माण केला. विराट कोहली शानदार लयीत दिसला. त्याने केवळ 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने 37 चेंडूंत 58 धावांची खेळी करताना 4 चौकारांसह 3 षटकार ठोकले, तर देवदत्त पडिक्कलनेही 4 चौकार व 3 षटकारांसह 45 धावा केल्या.
कोहलीचे विक्रम
विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सप्रमाणेच आता कोहलीच्याही नावावर 210 अर्धशतकी भागीदारी जमा झाल्या आहेत. या विशेष यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 200, पाकिस्तानचा बाबर आझम 196 आणि वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल 191 अर्धशतकी भागीदाऱ्यांसह मागील क्रमांकावर आहेत.
कोहली आतापर्यंत आयपीएलमध्ये 138 अर्धशतकी भागीदाऱ्यांचा भाग राहिला आहे. या यादीत त्याच्या मागे मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा असून त्याच्या नावावर 107 अशा भागीदाऱ्या आहेत.


























































