IPL 2026 – हा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता! रोहित शर्माने मानले मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्यांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससोबत आपली यशस्वी 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना रोहित भावूक झाला. “हा केवळ माझा एकट्याचा प्रवास नसून, यात तुम्हा सर्वांचा मोलाचा वाटा आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोहितने आपल्या भाषणात पोलार्ड, हार्दिक, सूर्या, शार्दुल, मलिंगा आणि प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले. तो म्हणाला मित्रांनो, हा दिवस इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद. आपण 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण हे यश संपूर्ण टीमच्या मेहनतीशिवाय शक्य नव्हते. ही टीम, ही फ्रँचायझी आणि येथील माणसे माझ्यासाठी खूप खास आहेत, असे रोहित म्हणाला.

या फ्रँचायझीने मला खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची कला शिकवली. आज मी जो काही एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून उभा आहे, त्यात मुंबई इंडियन्सचा मोठा वाटा आहे, असे म्हणत रोहितने यावेळी आकाश अंबानी आणि नीता अंबानी यांचेही आभार मानले. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आपल्याला एका खेळाडूच्या रूपात प्रगती करता आली, असे त्याने नमूद केले.

पोलार्ड नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, या टीमचा वारसा आपण असाच पुढे नेऊया. ही लेगसी आणखी उंचीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू, असा विश्वास त्याने व्यक्त केला. तसेच मी जो काही आहे, तो या फ्रँचायझीमुळेच आहे. नेतृत्व करण्याची कला मी इथेच शिकलो, असेही रोहित शर्मा म्हणाला.

रोहित भाईचा मुंबई इंडियन्ससोबतचा 15 वर्षांचा हा प्रवास म्हणजे एक विलक्षण आणि अभूतपूर्व कामगिरी आहे. एकाच फ्रँचायझीसाठी इतका प्रदीर्घ काळ खेळणे आणि त्यासोबत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकणे हे त्याच्या सातत्याचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. तो या टीमचा कणा आहे, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

मैदानाच्या बाहेर रोहित अगदी सामान्य माणसासारखा असतो. तो खूप मनमोकळा आणि मजेशीर आहे. त्याला सहकाऱ्यांसोबत गप्पा मारायला आणि थट्टा-मस्करी करायला खूप आवडते. मैदानावर तो कितीही गंभीर किंवा आक्रमक वाटला, तरी मैदानाबाहेर तो सर्वांशी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने वागतो. त्याच्याशी संवाद साधताना तो एक मोठा स्टार आहे असे कधीच जाणवत नाही, असे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर म्हणाला.