आयपीएल नम्मा चिन्नास्वामीयल्ले आयपीएल आयोजनासाठी बंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षित

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) 2025 मध्ये जेतेपद पटकावले, पण त्या आनंदाच्या निमित्ताने चिन्नास्वामी स्टेडियमला फार मोठी किंमत मोजावी लागली. विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर चिन्नास्वामीच्या प्रतिष्ठsला तडा गेला, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि त्याचा थेट फटका त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना बसला. महिला वर्ल्ड कप आणि आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून चिन्नास्वामीला वगळण्यात आले. क्रिकेटच्या नकाशावरून कुणीही गायब करील असे चिन्नास्वामी स्टेडियम नव्हे. हे स्टेडियम सर्व दृष्टीने सुरक्षित असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले असून आगामी आयपीएलचे सामने चिन्नास्वामीवर खेळविले जाणार आहेत. ही बातमी कानावर पडताच सर्व कानडी चाहत्यांनी आयपीएल नम्मा चिन्नास्वामीयल्ले असा आनंद व्यक्त केला.

गेल्या महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला तेव्हा त्यातून बंगळुरूच्या चिन्नास्वामीचा पत्ता कापण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल सामन्याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती. बंगळुरूचे सामने नवी मुंबईला खेळविण्याची तयारी सुरू केल्याचीही चर्चा होती. अखेर या चर्चांना कायमचा पूर्णविराम देण्यात आला आहे. आता चिन्नास्वामीची ओळख बदलली जाणार नाही. आयपीएलचा आत्मा इथेच आहे,’ असे ठाम शब्दांत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी जाहीर केले.

केएससीएच्या निवडणुकीत मतदानानंतर बोलताना शिवकुमार म्हणाले, या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटींची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, पण त्यावर उपायही आम्हीच करणार!’ सरकारकडून स्टेडियममध्ये अत्याधुनिक गर्दी-व्यवस्थापन प्रणाली, प्रवेश-बाहेर जाण्याच्या मार्गाची पुनर्रचना, डिजिटल तिकीट प्रणाली आणि कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिन्नास्वामीवर बंदीचा ‘पडदा’ पडणार, अशी एकेकाळी हवा होती, मात्र आता चित्र उलटं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांची शिक्षा, आयपीएलची शाबासकी! चिन्नास्वामी संकटातून बाहेर पडले असून त्यांना आपली चूक मान्य आहे, पण ते हद्दपार होणार नाही, हा संदेश कर्नाटक सरकारने दिला आहे. चिन्नास्वामीवरून क्रिकेट गायब होणार ही कल्पनाच क्रीडाप्रेमींना अस्वस्थ करणारी होती, पण आता पुन्हा एकदा चिन्नास्वामीवर क्रिकेटची षटकारबाजी दिसेल. पुन्हा तोच जल्लोषही होईल.